प्रकाश पाटील -- कोपार्डे दूध उत्पादक गाई व म्हैशीचे गगनाला भिडलेले दर सर्वसामान्य शेतकरी, अल्पभूधारक व रोजंदारी लोकांच्या आवाक्याबाहेर गेलेले आहेत. जर दूध उत्पादनाला चालना द्यावयाची झाल्यास गाई, म्हैशी खरेदीसाठी अनुदान देऊन दूध उत्पादकांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या अंतर्गत लाभार्थ्यांना दोन, चार आणि सहा किंवा त्याहून अधिक गाई, म्हैशी गट घेण्यासाठी ५0 ते ७५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे.राज्य शासनाने गाई, म्हशींसाठी ५0 ते ७५ टक्क््यांपर्यंत अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ५0 टक्के, तर अनुसूचित जाती आणि आदिवासी प्रवर्गातील लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानातून दुधाळ संकरित गाई आणि म्हशींच्या गटाचे वाटप करण्यात येणार आहे. महिला बचत गटातील लाभार्थी, अल्पभूधारक शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार यांना प्राधान्याने लाभ देण्यात येणार आहे. यात ३0 टक्के महिला लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. निवड झाल्यानंतर एक महिन्याच्या कालावधीत लाभार्थ्यांना स्वत:च्या हिश्श्याची रक्कम उभारावी लागेल.या योजनेअंतर्गत गाय किंवा म्हशींच्या दोन जनावरांच्या गटासाठी जनावरांची रक्कम ८0 हजार रुपये आणि तीन वर्षांच्या विम्यासाठी ५ हजार ६३ रुपये असे एकूण ८५ हजार ६१ किंमत आधारभूत धरण्यात आली आहे. चार जनावरांच्या गटासाठी १ लाख ६0 हजार रुपये आणि १0 हजार १२५ विमा रक्कम असे १ लाख ७0 हजार १२५ रुपये, तर सहा जनावरांचा गट घेणाऱ्या लाभार्थ्याला जनावरे खरेदीसाठी २ लाख ४0 हजार रुपये, जनावराच्या गोठ्यासाठी ३0 हजार रुपये, स्वयंचलित चारा कटाई यंत्रासाठी, खाद्य साठविण्याच्या शेडसाठी प्रत्येकी २५ हजार तसेच जनावरांच्या तीन वर्षांच्या विम्यासाठी १५ हजार १८५ रुपये असे एकूण ३ लाख ६५ हजार रुपये याप्रमाणे किंमत निश्चित करण्यात आली आहे.
गाई, म्हशींच्या खरेदीस ५0 ते ७५ टक्के अनुदान
By admin | Updated: November 21, 2015 00:15 IST