कोल्हापूर : सोलर रुफ टॉप अर्थात छतावर सौर पॅनेल उभे करणे हे आतापर्यंत स्वच्छेचे काम होते; पण आता अपारंपरिक ऊर्जा स्रोतांना आलेले महत्त्व आणि ग्राहकांची होणारी बचत लक्षात घेऊन महावितरणच्या माध्यमातून केंद्र सरकारने अनुदानाचे बुस्टर देण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल ४० टक्के अनुदान देऊन लोकांना सोलर रुफ टॉप पॅनेल छतावर बसवण्यासाठी उद्युक्त केले जात आहे. महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना याचा लाभ घेता येणार आहे.
रुफ टॉॅपवरील सोलर हे अलीकडचे तंत्र आहे. महावितरण आणि मेडाकडून ही यंत्रणा बसवून दिली जाते. हे युनिट बसवल्याने घरगुती वीज बिलात मोठी बचत होते, शिवाय शिल्लक राहिलेली वीज नेटमीटरींगद्वारे महावितरणलाच विकून त्याचाही लाभ घेता येतो. वीज बिलात मोठी बचत होत असल्याने या तंत्राला पहिल्या पासून चांगला प्रतिसाद मिळत आहे; पण हे सोलर पॅनेल बसवण्यासाठी सुरुवातीला येणारा सव्वा लाख ते चार लाखापर्यंतचा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नसल्यानेच याकडे श्रीमंत लोकच आकृष्ट झाले. शिवाय याला अनुदान मिळत नसल्याने सर्वसामान्य लोक यापासून चार हात लांबच राहिले. आता सर्वसामान्य नागरिक पुढे ठेवून याला अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याने भविष्यात रुफ टॉपला चांगले दिवस येणार आहेत. ही योजना राबवण्यासाठी परिमंडलनिहाय एजन्सीची नियुक्ती केली आहे. त्याची यादी महावितरणच्या वेबसाईटवर आहे
चौकट
गेल्या दोन वर्षात १८ लाख युनिट वीज निर्मिती
स्वच्छेने युनिट उभे करायचे असले तरी कोल्हापुरात गेल्या दोन वर्षात १३६० ग्राहकांनी ३२ लाख युनिट विजेची निर्मिती करून शकणारे सोलर रुफ टॉप बसवून घेतले. त्यातून ऑगस्ट महिन्याअखेर १८ लाख युनिट विजेची निर्मितीही झाली. त्यातील ५ लाख युनिट वीज त्यांनी महावितरणला विकून अतिरिक्त पैसाही मिळवला.
चौकट
असे मिळणार अनुदान
घरगुती ग्राहकासाठी : ४० टक्के
गृहनिर्माण संस्था व निवासी संकुलांना: २० टक्के
घरगुती ग्राहकांसाठी १ ते ३ किलोवॅटसाठी: ४० टक्के तर ३ ते १० किलो वॅटपर्यंत २० टक्के
सामूहिक वापरासाठी ५०० किलो किलोवॅटपर्यंत : २० टक्के
चौकट
अशी आहे प्रकल्प किंमत
३ किलोवॅटपर्यंत १ लाख २४ हजार १४० चा खर्च येणार आहे. त्यातील ४९ हजार ६५६ रुपये केंद्राचे अनुदान असणार आहे. प्रत्यक्षात ग्राहकास ७४ हजार ४८४ रुपये खर्च करावा लागणार आहे. १०० युनिटपर्यंतचा वापर असणाऱ्या ग्राहकांसाठी १ किलोवॅटची यंत्रणा पुरेशी ठरते. त्यामुळे दरमहा ५५० रुपयांची वीज बिलांची बचत होते.
चौकट
ग्राहक व कंपन्यांकडून नाराजीदेखील
सोलर रुफ टॉप योजना कितीही चांगली असली तरी त्यांच्या अंमलबजावणीविषयी आणि महावितरणच्या हेतूविषयी शंका असल्याने ग्राहक आणि कंपन्यांकडून नाराजीही व्यक्त होताना दिसत आहे. अनुदानाची प्रक्रिया क्लीष्ट आणि वेळ खाऊ आहे, त्यात सुधारणा हवी, अशी साधारपणे अपेक्षा आहे. शिवाय नवे युनिट उभे करण्याचा वेगही कमी आहे. निविदांच्या बाबतीतही नाराजी असून, सौर उद्योजकांचा बहिष्कार असल्याची परिस्थिती आहे.