कोल्हापूर : शहरापासून सुमारे दोन किलोमीटरवर असलेल्या वडणगे (ता. करवीर) येथे हिवतापाच्या साथीचा फैलाव झाला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून ही साथ गतीने फैलावत आहे. यामुळे आरोग्य विभागाची पथके गावात दाखल झाली आहेत. प्रत्येक कुटुंबाचा रोज सर्व्हे करून संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेतले जात आहेत.गावची लोकसंख्या साडेअकरा हजार आहे. या गावात पहिल्यांदा २६ जून रोजी तुरळक प्रमाणात हिवतापाचे रुग्ण मिळाले. त्यामुळे आरोग्य विभागाचे पथक दाखल होऊन वेळीच उपाययोजनाही सुरू केल्या; परंतु, रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढते आहे. परिणामी, आरोग्य यंत्रणा चक्रावून गेली आहे. साथ पूर्णपणे आटोक्यात आणणे आव्हानात्मक बनले आहे. यामुळेच ६० आरोग्यसेवक, १५ वैद्यकीय अधिकारी, ६ आरोग्य सहायक असे पथक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या मदतीने जागृती करीत आहे. प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन त्वरित उपचारांची सेवा दिली जात आहे. गावात पिण्याच्या पाण्याचा अनियमित पुरवठा होत असतो. यामुळे बहुतांश कुटुंबांचा पाणी साठवून ठेवण्याकडे कल असतो. साठविलेल्या पाण्यात डासांची निर्मिती होत असल्याने डासांच्या माध्यमातून हिवताप फैलावत आहे. हा आजार पूर्णपणे आटोक्यात आणणे अडचणीचे होत आहे. ग्रामस्थांना साठविलेले पाणी झाकून ठेवा, कोरडा दिवस पाळा, डासांपासून वैयक्तिक संरक्षण करा, घराशेजारी पडलेल्या विनावापर वाहनांच्या टायरची विल्हेवाट लावा, असे आवाहन आरोग्य पथक करीत आहे.
वडणगेतील हिवतापाची साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य प्रशासन प्रयत्नशील आहे. आरोग्य पथक प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन पाहणी करीत आहे. जनजागृती करीत आहे. डासांद्वारे फैलाव होत असल्याने ग्रामस्थांनी सतर्क राहावे. - विजय नांद्रेकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद