करवीर तालुका कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णाच्या बाबतीत आघाडीवर आहे. शहरालगतचा तालुका असल्याने आणि तालुक्यातील सर्व प्रशासकीय कार्यालये शहरात असल्याने नागरिकांना शहरात कामानिमित्त आणि नोकरीनिमित्त दररोजचा हमखास संपर्क आहे. याचाही परिणाम कम्युनिटी स्प्रेडचा मोठा परिणाम कोरोना रुग्णवाढीवर दिसत आहे.
उपनगर व शहरालगतच्या गावांत जनतेकडून सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळला जात नाही, याशिवाय मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्यात टाळाटाळ केली जात असल्याने दिवसेंदिवस इतर तालुक्यांच्या तुलनेत करवीर तालुक्यातील दररोजच्या रुग्णवाढीचा दर दुप्पट वाढत चालला आहे
३० मार्चला तालुक्यात ८ रुग्ण सापडले होते. यानंतर गेल्या दहा दिवसांत २१० नवीन रुग्णांची भर पडली आहे. दररोज किमान २० ते २५ रुग्ण तालुक्यात सापडत आहेत. आता कम्युनिटी स्प्रेडचा धोका दिसू लागला असून, आमशी, म्हारूळ, सांगरुळ या ग्रामीण भागात रुग्ण सापडत असल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. लसीकरणाचे आव्हान पेलण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सुट्टी न घेता काम सुरू ठेवले होते. ४५ वर्षांवरील ३७ हजारांवर लोकांना लसीकरण करण्यात आले आहे.