कोल्हापूर : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत उतरलेल्या ताराराणी आघाडी, एस फोर ए आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष, बसप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आदी पक्षांनी त्यांच्या उमेदवारांना ‘कपबशी’ हेच चिन्ह मिळावे म्हणून आग्रह धरल्याने राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार लॉटरी पद्धतीने कपबशी चिन्हाचे वाटप करण्याची वेळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर आली. या लॉटरीमध्ये ताराराणी आघाडीचे उमेदवार भाग्यवान ठरले. त्यांच्या जवळपास ३५ उमेदवारांना ‘कपबशी’ मिळाली. शहरातील ८१ प्रभागांपैकी २६ ठिकाणी लॉटरी पद्धतीचा अवलंब करावा लागल्याचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत संपल्यानंतर शनिवारी सर्व उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यासाठी सातही क्षेत्रीय निवडणूक कार्यालयांत उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. कॉँग्रेस, राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष, शिवसेना या आयोगाच्या मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांना त्यांची नोंदणीकृत चिन्हे देण्यात आली. त्यामध्ये कसलीही आडकाठी आली नाही. मात्र, यंदा प्रथमच मनपा निवडणुकीत ताराराणी आघाडी, एस फोर ए आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष, बसप, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी पाच नोंदणीकृत पक्षांनी आपले उमेदवार उभे केले आहेत. या पक्षांच्या उमेदवारांनी कपबशी या लक्षवेधी व लोकप्रिय चिन्हासाठी प्राधान्य दिले होते. जेव्हा एकापेक्षा अधिक मान्यताप्राप्त पक्षांचे उमेदवार एकाच चिन्हाची मागणी करतात, तेव्हा त्याबाबत हे चिन्ह कोणाला द्यावे, याचा निर्णय चिठ्ठ्या टाकून घेतला जावा, असा निवडणूक आयोगाचा नियम आहे. त्यामुळे शनिवारी सातही कार्यालयांत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना या नियमाचा आधार घेत ‘लॉटरी’ पद्धतीचा अवलंब करावा लागला. ज्या प्रभागात ताराराणी आघाडीसह अन्य पक्षांचे उमेदवार आहेत, तेथेच लॉटरी काढावी लागली आणि जेथे ‘ताराराणी’चे उमेदवार उभे नाहीत, तेथे मात्र अपक्ष उमेदवारांना कपबशी चिन्ह देण्यात आले. ताराराणी आघाडीने ३८ उमेदवार उभे केले असून त्यांच्या ३६ उमेदवारांना त्यांच्या पसंतीचे कपबशी हे चिन्ह मिळाल्याचे सांगण्यात आले. कपबशी चिन्हाच्या बाबतीत या आघाडीचे उमेदवार भाग्यवान ठरले. फक्त व्हीनस कॉर्नर प्रभागातील उमेदवार प्रकाश नाईकनवरे यांना पतंग, तर दौलतनगर प्रभागातील विलास वास्कर यांना रोड रोलर चिन्हावर समाधान मानावे लागले. अन्य पक्षांच्या उमेदवारांना कोठेही एकसारखे चिन्ह मिळाले नाही. (प्रतिनिधी)
ताराराणी आघाडीच्या ३६ उमेदवारांना ‘कपबशी’
By admin | Updated: October 18, 2015 01:20 IST