गडहिंग्लज : ‘गडहिंग्लज’च्या पहिल्या देहदात्या अनुराधा सुधाकर गोकाककर यांच्या चौथ्या स्मृतिदिनी आयोजित कार्यक्रमात ३५ जणांनी देहदानाचा संकल्प सोडला. देहदान चळवळीचे संकल्पक दिवंगत प्रा. डॉ. सुधाकर गोकाककर दाम्पत्याच्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला.यापूर्वी देहदानाची संकल्प पत्रे भरून दिलेल्या २०० जणांना संकल्पपत्र वितरण आणि संपूर्ण कुटुंबीयांच्या देहदानाचा संकल्प केलेल्या कुटुंबप्रमुखांचा गौरव करण्यात झाला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी नेते माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे होते. नगरपालिकेच्या शाहू सभागृहात हा कार्यक्रम झाला.डॉ. रजनी जोशी म्हणाल्या, गडहिंग्लजचा शैक्षणिक आणि सामाजिक पाया मजबूत आहे. त्यामुळेच देहदान चळवळीस वाढता प्रतिसाद मिळत आहे. डॉ. सुरेश संकेश्वरी म्हणाले, गोकाककर दाम्पत्याने क्रांतिकारक संकल्प केला. शरीररचना शास्त्राच्या अभ्यासासाठी मृतदेहांची गरज असते. यातूनच डॉक्टरांचे कौशल्य विकसित होते. ही चळवळ पुढे नेवूया. अनघा कुलकर्णी म्हणाल्या, गडहिंग्लज ही चळवळींची भूमी आहे. त्यामुळेच इथे देहदानाच्या संकल्पाने नववर्षाचे स्वागत होते. गोकाककर कुटुंबीयांसाठी हा आनंदाचा दिवस आहे. यावेळी ‘अंनिस’चे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाश भोईटे, प्रवीण शहा, आप्पासाहेब सरदेसाई, निवृत्ती कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. अॅड. शिंदे यांचे अध्यक्षीय भाषण झाले. कार्यक्रमास डॉ. संध्या पाटील, डॉ. एम. एस. बेळगुद्री, प्राचार्य गंगाराम शिंदे, सुभाष धुमे, अरुण बेळगुद्री, अंगद गोकाककर, बचाराम काटे, डॉ. रचना थोरात उपस्थित होते. प्राचार्य जे. बी. बार्देस्कर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. स्वाती कोरी यांनी मानपत्राचे वाचन केले. प्राचार्य साताप्पा कांबळे यांनी परिचय करून दिला. गणपतराव पाटोळे यांनी सूत्रसंचालन, तर उज्ज्वला दळवी यांनी आभार मानले.
देहदानाचा ३५ जणांनी केला संकल्प !
By admin | Updated: January 1, 2016 00:32 IST