लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : तीनवेळा लांबणीवर पडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा (एमपीएससी) आता सुधारित वेळापत्रकानुसार मार्च-एप्रिलमध्ये होणार आहेत. एकूण १,२२३ जागांसाठी होणाऱ्या या तीन परीक्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे ३३ हजार ५०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांकडून तयारी, उजळणीचा वेग वाढणार आहे.
‘एमपीएससी’ने राज्य सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षांसाठी सन २०१९मध्ये अर्ज मागविले होते. या परीक्षा गेल्यावर्षी अनुक्रमे दिनांक ११ ऑक्टोबर आणि दिनांक १ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार होत्या. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात दिनांक ५ मे २०२० रोजी प्रसिद्ध झाली. ही परीक्षा २२ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार होती. मात्र, कोरोनामुळे एमपीएससीने या परीक्षा पुढे ढकलल्या. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने या परीक्षांच्या सुधारित तारखा सोमवारी (दि. ११) जाहीर करण्यात आल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील १३,५०० विद्यार्थ्यांनी राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सुमारे १५ हजार, तर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेसाठी सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्य सेवेसाठी कोल्हापुरात ४१, तर दुय्यम सेवा परीक्षेसाठी ४५ केंद्र पूर्वीच्या नियोजनानुसार निश्चित केलेली आहेत. त्यामध्ये फारसा बदल होणार नाही. परीक्षा लांबणीवर पडल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासात काहीसा खंड पडला होता. आता परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर झाल्याने त्याबाबतचा विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर झाला आहे.
प्रतिक्रिया
‘एमपीएससी’ने आता परीक्षा देण्याच्या संधींची संख्या निश्चित केली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रवर्गाला या संधींनुसार परीक्षा देता येण्यासाठी ‘एमपीएससी’ने वेळेवर परीक्षा घेणे आवश्यक आहे.
- अभय पाटील, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक
प्रतिक्रिया
कोरोनामुळे परीक्षा लांबणीवर पडल्याने वयोमर्यादेच्या मुद्द्यावरून विद्यार्थी मानसिक तणावाखाली होते. परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्याने या विद्यार्थ्यांचा हा तणाव नाहीसा झाला आहे. त्यांनी पूर्ण तयारीनिशी परीक्षा द्यावी.
- दुष्यंत राजेभोसले, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक
आकडेवारी दृष्टिक्षेपात
परीक्षानिहाय पदसंख्या
राज्य सेवा पूर्व परीक्षा : २००
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा : २१७
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा : ८०६