बाजारभोगाव : कासारी व जांंभळी खोऱ्यात गेले दोन दिवस जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे कासारी नदीस पूर आला आहे. या पुरामुळे बाजारभोगाव ते पोहाळे तर्फे बोरगाव दरम्यान असणाऱ्या मोडक्या वडाजवळील मोरीवर कासारी नदीच्या पुराचे पाणी आज सायंकाळी सहाच्या सुमारास आल्याने कोल्हापूर -बाजारभोगाव- अणुस्करा- राजापूर हा राज्यमार्ग बंद झाला आहे. मुसळधार पावसामुळे ७३ टक्के कासारी प्रकल्प भरला आहे. त्यामुळे या प्रकल्पातून ३१७४ क्युसेक प्रति सेकंद दराने विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.
या मुसळधार पावसामुळे सहा बंधारे पाण्याखाली गेले आहे. पुनर्वसु नक्षत्राच्या शेवटच्या चरणात पावसाने सुरुवात केली तर पुष्य नक्षत्रात गेली दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे या पावसामुळे ओढे,नाले भरून वाहत असून कासारी नदीस पूर आला आहे. या पुरामुळे कासारी नदीवरील वाळोली, बाजारभोगाव, पेंढाखळे, करंजफेन, बर्की तर जांभळी नदीवरील मुगडेवाडी हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कासारी मध्यम प्रकल्प येथील पर्जन्यमान केंद्रात मागील चोवीस तासात १७४ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
दरम्यान सायंकाळी सहाच्या सुमारास बाजारभोगाव ते पोहाळे तर्फ बोरगावमधील असणाऱ्या मोडक्या वडाजवळील मोरीवर कासारी नदीच्या पुराचे पाणी आल्याने हा कोल्हापूर - राजापूर राज्यमार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. या मार्गावर एक फुटापेक्षा जास्त पाणी असूनही धोकादायक परिस्थितीत वाहतूक सुरू होती. असाच पावसाचा जोर कायम राहिल्यास बाजारभोगाव येथील बाजारपेठेत पुराचे पाणी येण्याची शक्यता आहे.