कोल्हापूर : आयुर्वेद डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील ३०० हून अधिक रुग्णालये शुक्रवारी बंद ठेवण्यात आली. ८०० डॉक्टर्सनी या काम बंद आंदोलनामध्ये सहभाग घेतला. मात्र काही ठिकाणी तातडीची वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आबसाहेब शिर्के, मानद सचिव डॉ. गीता पिल्लाई यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
‘सीसीआयएमए’च्या गॅझेटमध्ये बदल करून पदव्युत्तर आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. आयुर्वेद हे मोठे शास्त्र आहे; तर ॲलोपथी हे आधुनिक वैद्यकीय शास्त्र आहे. प्रत्येकाचे अभ्यासक्रम वेगळे आहेत. निदान पद्धती, उपचार पद्धती वेगळी आहे. अशा परिस्थितीत अपुरे ज्ञान व शल्यकौशल्य असताना कठीण शस्त्रक्रिया करण्याची संमती देणे म्हणजे रुग्णाचे जीवन धोक्यात आणल्यासारखे होणार आहे. म्हणून हा अध्यादेश मागे घ्यावे यासाठी ॲलोपथी डॉक्टर्संनी संप पुकारला होता. आयुर्वेदाला विरोध नसल्याचेही या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
यामध्ये जिल्ह्यातील ३०० रुग्णालये आणि ८०० डॉक्टर सहभागी झाल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी खजानिस डॉ. शीतल देसाई, डॉ. पी. एम. चौगुले, डॉ. रवींद्र शिंदे, डॉ. अमोल कोडोलीकर यांनी संपाचा आढावा घेतला.