इचलकरंजी : नगरपालिकेच्या विविध ठिकाणी असलेल्या व्यापारी संकुलांमधील दुकानगाळ्यांकडील भाड्याची वसुली २ कोटी २९ लाख रुपये असून, त्याच्या वसुलीसाठी उपमुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत एकाच दिवसात सुमारे पाच लाख रुपयांची वसुली झाली असल्याची माहिती मालमत्ता अधीक्षक चंद्रकांत पवार यांनी दिली.नगरपालिकेच्या मालकीची वीस व्यापारी संकुले शहरामध्ये विविध ठिकाणी असून, त्यामध्ये असलेल्या ७२३ दुकानगाळ्यांकडे यंदाच्या भाड्याची वसुली १ कोटी ९४ लाख रुपये आहे. तर सुमारे ७० दुकानगाळ्यांकडे जुनी असलेली थकबाकी ३५ लाख रुपये आहे. सदरचे ३५ लाख रुपये वसूल करणे हे सध्याचे नगरपालिकेच्या मालमत्ता विभागाचे लक्ष्य आहे. म्हणून धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे, असे सांगून पवार म्हणाले, धडक मोहिमेंतर्गत संबंधित मालमत्ताधारकांनी थकबाकी न भरल्यास दुकानाचे गाळे सील करण्यात येतील आणि त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.अशा प्रकारची मोहीम गुरूवार (दि.१९) पासून सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी एकाच दिवसात पाच लाख रुपयांचे धनादेश जमा झाले आहेत. (प्रतिनिधी)भाड्यामध्ये लक्षणीय वाढदहा वर्षांची मुदत संपलेल्या दुकानगाळेधारकांकडून गाळे परत घेऊन त्याचा फेरलिलाव करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्याधिकारी डॉ. म्हेत्रे यांनी दिली. नगररचना सहायक संचालकांकडे अशा दुकानगाळ्यांचे भाडे ठरवून मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आता पालिकेकडील दुकानगाळ्यांच्या भाड्यामध्ये लक्षणीय वाढ होईल. ज्यामुळे सर्वसाधारण वार्षिक अडीच कोटी रुपयांचे भाडे मिळण्याची अपेक्षा आहे.इचलकरंजी नगरपालिकेची व्यापारी संकुल असलेली शॉपिंग सेंटरची इमारत.
पालिकेच्या दुकानगाळ्यांची अडीच कोटी रूपये थकबाकी
By admin | Updated: January 20, 2017 23:47 IST