कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या एम.बी.ए. रुरल मॅनेजमेंट, एम. टेक. रुरल टेक्नॉलॉजी अशा पाच अभ्यासक्रमांसाठी रविवारी २१७ जणांनी आॅफलाईन स्वरूपात प्रवेश परीक्षा दिली. तसेच २२९ जणांनी परीक्षेला दांडी मारली. विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षांचा चौथा आणि अखेरचा टप्पा पूर्ण झाला. चार टप्प्यांतील परीक्षांची पहिली गुणवत्ता यादी १५ जून रोजी प्रसिद्ध होणार आहे.विद्यापीठातील मानव्यशास्त्र इमारतीमध्ये परीक्षार्थींची बैठक व्यवस्था केली होती. सकाळी दहा ते साडेअकरा या वेळेत परीक्षा झाली. यात एम. एस. डब्ल्यू. रुरल कम्युनिटी डेव्हलपमेंट अभ्यासक्रमासाठी ११९, एम.सी.ए. रुरल इन्फॉर्मेटिकसाठी २३, एम.बी. ए. रुरल मॅनेजमेंटसाठी ४५, एम.टेक्. रुरल टेक्नॉलॉजीसाठी १६, एम. सी. ए.साठी १४ विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली. परीक्षांसाठी सकाळी नऊपासून विद्यार्थ्यांनी विद्यापीठात गर्दी केली होती. या अभ्यासक्रमांच्या परीक्षेसाठी एकूण ४४६ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नोंदणी केली होती. विद्यापीठातर्फे मेमध्ये चार टप्प्यांत झालेल्या प्रवेश परीक्षांची पहिली गुणवत्ता यादी १५ जून रोजी प्रसिद्ध होईल. याबाबत २० जूनपर्यंत हरकती नोंदविण्याची मुदत आहे. अंतिम गुणवत्ता यादीची २४ जून रोजी प्रसिद्धी होईल. त्यानंतर २९ व ३० जून रोजी पहिल्या फेरीतील प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती पदव्युत्तर विभागाचे उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी दिली. (प्रतिनिधी)‘मास’साठी पुनर्परीक्षामास कम्युनिकेशनसाठी उपलब्ध जागांच्या तुलनेत प्रवेश परीक्षा देणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे या विभागाकडून पुनर्प्रवेश परीक्षा घेण्याची मागणी झाली आहे. त्याबाबत विद्यापीठाच्या अधिकार मंडळांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.
पाच अभ्यासक्रमांसाठी २१७ जणांची प्रवेश परीक्षा
By admin | Updated: June 1, 2015 00:12 IST