जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या निवडणुकीत ४२६ पैकी २२८ जागांवर महिलाराज अवतरले आहे. त्यामुळे ५० टक्क्यांहून अधिक जागा महिलांनी पटकाविल्या आहेत. शिवाय १८ ग्रामपंचायतींत सरपंचपदाच्या खुर्चीवर महिला विराजमान होणार आहेत. तालुक्यात नुकत्याच ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. राज्यात आदर्शवत ठरलेल्या बूबनाळ ग्रामपंचायतीमध्ये सर्व अकरा जागांवर महिलांना संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करून शासनाच्या बक्षिसास पात्र ठरली आहे. महिला आरक्षण पडल्यामुळे इच्छुकांची मोठी गोची झाली होती. यामुळे पत्नी, आई यांना उमेदवारी देऊन ग्रामपंचायतीत नेतृत्व करण्याची संधी प्राप्त करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. काहींना यश, तर काहींना अपयश आले. दरम्यान, तालुक्यात ४२६ जागांपैकी २२८ जागांवर महिलाराज अवतरले आहे. विशेष म्हणजे आलास, अर्जुनवाड, बस्तवाड, दानोळी, दत्तवाड, गणेशवाडी, घालवाड, कोथळी, कुटवाड, मजरेवाडी, नांदणी, निमशिरगाव, नृसिंहवाडी, शेडशाळ, शिरढोण, तमदलगे, उदगाव, यड्राव, बूबनाळ, आदी १८ ग्रामपंचायतींत सरपंचपदाच्या खुर्चीवर महिला विराजमान होणार आहे. यामुळे ३३ पैकी १८ ग्रामपंचायतींत महिलाराज अवतरणार आहे. महिलांनी खंबीरपणे कारभार हाकावा, अशी अपेक्षा व्यक्त होत असून, महिलांना मोठी संधी मिळाली आहे. या संधीचे त्यांनी सोने करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
१८ ग्रामपंचायतींत महिला सरपंच
By admin | Updated: July 30, 2015 00:28 IST