कोल्हापूर : कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजकांना जगभरातील औद्योगिक तंत्रज्ञान आणि संशोधनाबद्दल माहिती मिळावी या हेतूने कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स आणि अर्थमुव्हिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत येथील शाहूपुरी जिमखाना मैदानावर ‘इंडस्ट्रिया २०१५’ या औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात देश-विदेशांतील सुमारे १५० कंपन्या सहभागी होत असून, कोल्हापुरातील उद्योग जगताला ही एक अपूर्व संधी असेल, असा संयोजकांचा दावा आहे. ‘कोल्हापूर चेंबर आॅफ कॉर्मस’चे अध्यक्ष आनंद माने व अर्थमुव्हिंग असो.चे अध्यक्ष भैया घोरपडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. यावेळी स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन, गोशिमाचे अध्यक्ष अजित आजरी, पंचतारांकित औद्योगिक वसाहत संघटनेचे अध्यक्ष संजय जोशी, इंजिनिअरिंग असो.चे अध्यक्ष प्रकाश चरणे, चेंबरचे उपाध्यक्ष संजय शेटे, ललित गांधी, क्रिएटिव्हचे सुजित चव्हाण, आदी उपस्थित होते. ‘इंडस्ट्रिया २०१५’ या प्रदर्शनात स्थानिक उद्योजकांच्या कौशल्याला संधी मिळणार असून, माहिती, ज्ञान, संशोधन यांचे आदान-प्रदान होणार आहे. प्रदर्शनाच्या काळात विविध विषयांवर चर्चासत्र आणि मार्गदर्शन शिबिराचेही आयोजन केले आहे. जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटनांच्या सहकार्याने आणि क्रिएटिव्हज या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडून व्यवस्थापन होणार आहे. प्रदर्शनातील कंपन्या प्रदर्शनात देश-विदेशांतील १५० कंपन्या सहभागी होतील. मॅकनेट, जाधव इंडस्ट्रीज, किर्लोस्कर, महिंद्रा जनसेट, आयशय, खतेंद्र, रिलायन्स पॉलिमर, आदित्य परिफेलर्स, गोदरेज, सिमेन्स, बॉश, परफेक्ट पीन, जिंदाल या कंपन्याही सहभागी होणार आहेत. तर फौंड्री, वस्त्रोद्योग, पॅकेजिंग, फायर फायटर, सोलस, आयटी, मशीन टुल्स, अॅटोमेशन, टेस्टिंग, मेजरिंग इक्विपमेंट, मटेरियल हॅँडलिंग, सीएनसी, व्हीएमसी, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, ट्युब पाईप, बेरिंग, चेन्स यासह अर्थमुव्हिंग क्षेत्रातील १५ ते २० स्टॉल्स असतील. गतवर्षी या प्रदर्शनाला ७० हजार लोकांनी हजेरी लावली होती. यंदाही तेवढेच किंबहुना जास्तच लोक हजेरी लावतील, अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे सर्वांना प्रवेश शुल्क असला, तरी अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोफत ठेवले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आणि कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली २८ नोव्हेंबरला सकाळी अकरा वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होईल, असे माने यांनी सांगितले. (प्रतिनिधी) उद्योजकांना त्यांच्या उत्पादनात वैविध्यता आणावी लागते. नवीन प्रयोग करावे लागतात. त्या विषयीची माहिती अशा प्रदर्शनातून मिळू शकते. तसेच नवीन कल्पना मिळू शकतात. ग्राहक शोधण्याचा प्रयत्न या प्रदर्शनातून होईल. - आनंद माने,अध्यक्ष-चेंबर आॅफ कॉमर्स मुंबई-बंगलोर इंडस्ट्रीयल कॉरिडोरचे काम प्राधान्याने हाती घेतले जाणार आहे. त्याचे ड्रॉर्इंग पूर्ण झाले आहे. या कामास गती देण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो आहे.- सुरेंद्र जैन, अध्यक्ष, स्मॅक
‘इंडस्ट्रिया’त १५० कंपन्यांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2015 00:36 IST