कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील अभयारण्यग्रस्त व धरणग्रस्तांना लवकरच शाहूवाडी, पन्हाळा येथील १२५ एकर मूलकीपड जमिनीचे वाटप केले जाईल, तसेच सांगली व सातारा जिल्ह्यांतील अभयारण्यग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर ६०० एकर जमिनीचे वाटप केले जाईल, असे आज येथे शासकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. येत्या सहा महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. कोल्हापूर, सांगली व सातारा येथील धरणग्रस्त, अभयारण्यग्रस्तांच्या प्रश्नांवर आज सायंकाळी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली; परंतु या बैठकीला कोल्हापूर व सांगलीचे जिल्हाधिकारी अनुपस्थित राहिल्याने काही प्रश्नांवर नुसतीच चर्चा झाली. याच प्रश्नांवर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सांगली येथे १५ जुलैदरम्यान बैठक घेण्याचे ठरले. खासदार राजू शेट्टी व माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी अभयारण्यग्रस्तांच्या व्यथा बैठकीत मांडल्या. सांगली जिल्ह्णातील १९ गावे, कोल्हापूर ६, तर सातारा जिल्ह्णातील ७ गावे ही अभयारण्यात येत होती. चांदोली धरणक्षेत्रात ३९ गावे येत होती. या गावांच्या योग्य पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. गावातील सर्वांच्या पुनर्वसनाचा प्रयत्न झाला तरी त्यांना दिलेल्या गावठाणात योग्य सोयी-सुविधा नाहीत. त्यांची मूळ घरं जंगलात असून त्यांचे मूल्यांकन झाले नाही. लाभार्थ्यांना पुरेशा जमिनी दिल्या नाहीत. पुनर्वसनाच्या ठिकाणी जनावरांना चारा, पाणी मिळत नाही, अशा तक्रारी बैठकीत मांडल्या. जिल्हा पुनर्वसन अधिकारी अमृत नाटेकर यांनी शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यात असलेली १२५ एकर मुलकीपड जमीन समान पद्धतीने वाटप केली जाईल, असे सांगितले तर वन विभागाच्या शिफारशीसह केंद्र सरकारकडे पाठविला जाईल, त्यानंतर के ंद्र सरकारच्या मंजुरीनंतर ६०० एकर जमिनीचे वाटप केले जाईल. परंतु या सर्व प्रक्रियेस सहा महिने लागतील, असे वन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. बैठकीस वन अधिकारी सत्यजित गुजर, पंडितराव यांच्यासह सुखदेव पाटील, प्रल्हाद पाटील, विजय पाटील, एन. डी. दीपक गावडे, लोहार, सावळा पाटील, वसंत पाटील, कोंडिबा अनुसे, राजू वडाम, राजू प्रभावळकर, तुकाराम गावडे, रमेश भोसकर आदी उपस्थित होते.
अभयारण्यग्रस्तांना लवकरच वाटणार १२५ एकर जमीन
By admin | Updated: July 4, 2014 00:53 IST