लोकमत न्यूज नेटवर्क
वारणानगर : गतवर्षीच्या गळीत हंगामात गाळपास आलेल्या ऊस उत्पादकांची ऊस बिले देण्यास चार-पाच महिने उशीर झाला याबाबत दिलगिरी व्यक्त करून फेबुवारीत उशिरा आलेल्या उसास प्रतिटन ७५ रुपये व मार्चमध्ये आलेल्या उसास अदा केलेल्या बिलापेक्षा प्रति टन ५० रुपये दीपावली भेट देण्याची घोषणा करून वारणेने इथेनॉल निर्मितीवर भर दिला असून, १२० कोटी रुपयांच्या इथेनॉल उत्पादनाच्या नवीन प्रकल्पास मंजुरी मिळाल्याची माहिती वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी सभेत दिली.
तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याची ६५ वी ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी वारणा शिक्षण संकुलाच्या सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष प्रतापराव पाटील होते.
आमदार कोरे म्हणाले, वारणेने नियोजनबद्ध विकास करण्याचा संकल्प राबवून निर्णय घेतले त्यामुळे येणारा गळीत हंगाम सर्व निकष पूर्ण करेल. गतवर्षी सरकार बदलल्याने थकहमी देण्यास राज्य सरकारने विरोध केल्याने १०० कोटी रुपये कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या. मात्र केंद्र शासनाने देशात पहिल्यांदाच विशेष बाब म्हणून राज्य शासनाच्या हमीशिवाय कर्ज मिळाल्याने तफावत भरून निघाली. त्यामुळे ऊस बिले देण्यास उशीर झाल्याचे सांगून या वर्षीचा गळीत हंगाम सुरू करताना कारखाना ३० कोटी रु. शिल्लक ठेवूनच कारखाना सुरू करणार असल्याचे कोरे यांनी सांगितले.
वारणेने इथेनॉल निर्मितीवर भर दिला असून १२० कोटी रु.चा नवा प्रकल्प मंजूर केला आहे. येत्या दसऱ्याला गळीत हंगामाच्या शुभारंभाबरोबर इथेनॉल निर्मितीला सुरुवात होईल. ३५० कोटी रु. भांडवली गुंतवणूक असणारा ४४ मेगावॅटचा कर्जमुक्त प्रकल्प महिन्याभरात कारखान्याच्या मालकीचा होणार आहे या माध्यमातून दरवर्षी १०० कोटी रुपयांची उत्पन्नात वाढ होणार आहे. वारणेचे गतवैभव पुन्हा साकारण्यासाठी शेतात पिकणारा सर्व ऊस वारणेलाच घालावा, असे आवाहनही आ. कोरे यांनी केले.
कार्यकारी संचालक शहाजी भगत यांनी नोटीस वाचन करून या वर्षी १५ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. सभेपुढील सर्व विषय सभासदांनी मंजूर केले.
व्यासपीठावर वारणा बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे, कारखान्याचे ज्येष्ठ संचालक रावसाहेब पाटील, श्रीनिवास डोईजड यासह सर्व संचालक, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच.आर. जाधव, नवशक्तीचे अध्यक्ष एन.एच. पाटील, वारणा समूहातील संस्थाचे पदाधिकारी, अधिकारी, सभासद उपस्थित होते. ज्येष्ठ संचालक सुभाष पाटील (नागांव) यांनी आभार मानले.
चौकट-
-- वारणा परिसरातील ६० हून अधिक गावांत ऑनलाइन पद्धतीने, यूट्युबद्वारे, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मोठ्या संख्येने सभासद सभेत सहभागी झाले होते.
.........
.
- शेतकरी सभासद पांडुरंग पाटील (अंबपवाडी) यांनी सांगितले, सुरुवातीला माझा १० टन ऊस येत होता. त्यात वाढ होऊन तो १०० टनावर गेला. हे फक्त वारणेमुळे घडले. वारणा आर्थिक अडचणीत असताना माझा २५ टन ऊस तसाच घ्यावा, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
---
फोटो ओळ-
तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याच्या ६५ व्या वार्षिक ऑनलाइन सभेत आमदार डॉ. विनय कोरे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी निपुण कोरे, प्रतापराव पाटील, रावसाहेब पाटील, श्रीनिवास डोईजड, सुभाष पाटील, कार्यकारी संचालक शहाजी भगत, दूध संघाचे उपाध्यक्ष एच.आर. जाधव व कारखाना संचालक उपस्थित होते.
-