कोल्हापूर : शहरातील बागल चौकातील मिळकतीला घरफाळ्याच्या दंडात परस्पर १२ लाख रुपयांची सूट देत अपहार केल्याच्या संशयावरून आयुक्त पी. शिवशंकर यांनी गुरुवारी एका वसुली सहायक अधीक्षकांसह असेसमेंट लिपिकास ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली. आठ दिवसांत समाधानकारक खुलासा न आल्यास निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी ‘लोकमत’ला दिली.बागल चौकात असणाऱ्या एका व्यापारी व नागरी वापरात असलेल्या संकुलाचा तब्बल २२ लाख रुपयांचा घरफाळा थकीत होता. संबंधित मिळकतधारकाने दंडव्याज माफ करण्याची विनंती महापालिका प्रशासनाकडे केली होती. दरम्यान, ताराराणी मार्केट येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्पर १० लाख रुपये भरून घेतले तसेच संबंधित मिळकतधारकाची बाकी शून्य केली. घडल्या प्रकारात तब्बल बारा लाखांचा अपहार झाल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू होती.दंड व्याजाचे नेमके काय झाले? कोणाच्या आदेशाने हे पैसे भरून घेऊन बाकी शून्य केली, असे सवाल आयुक्त पी. शिवशंकर यांनी उपस्थित करत गुरुवारी सकाळी तत्काळ त्यांनी ताराराणी कार्यालयातील सर्व दप्तरांचे तपासणीचे आदेश दिले. यावेळी बागल चौकातील मिळकतीला दिलेल्या सवलतीबाबत संबंधीतांना समाधानकारक खुलासा करता आला नाही. सर्व प्रकारांत मोठा गैरव्यवहार झाल्याच्या संशय आल्यानेचनोटीस बजावली आहे. (प्रतिनिधी)जुने अधिकारीही रडारवरयापूर्वीही थकीत घरफाळ्यावरील दंड व्याज माफ केल्याची घटना घडली असल्याची चर्चा आहे. एका अधिकाऱ्याने आपल्या अधिकारात थकीत घरफाळ्यावर होणारी १८ टक्के दंड व्याज माफ केले आहे. प्रत्यक्षात हे अधिकार आयुक्तांचे आहेत. महासभेलाही याबाबत निर्णय घेता येत नाही तरीही या अधिकाऱ्याने परस्पर आयुक्तांचे अधिकार स्वत:च वापरून दंड व्याज माफ करून त्यातून तुंबड्या भरून घेतल्याची चर्चा आहे. या प्रकरणाचीही आयुक्तांनी चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महापालिका वर्तुळातून होत आहे.५बागल चौकातील इमारतीला दंड व्याजात सूट दिल्याप्रकरणी दोघांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. आठ दिवसांत खुलासा पाहून थेट कारवाई करू.- आयुक्त पी. शिवशंकर
घरफाळा विभागात १२ लाखांचा अपहार
By admin | Updated: April 10, 2015 01:04 IST