गडहिंग्लज :
महाराजस्व अभियानांतर्गत जिल्ह्यातील पाणंद रस्ते खुले करण्याची मोहीम राबविली जात आहे. या उपक्रमामध्ये गडहिंग्लज तालुक्यातील ११० पाणंद रस्ते पक्के रस्ते बनविण्यासाठी पंचायत समितीकडे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पाणंद रस्ते पक्के बनविण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी शरद मगर यांनी दिली. गडहिंग्लज पंचायत समितीच्या मासिक सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती रूपाली कांबळे होत्या. जि. प. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विजय कांडगावे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी हरळी बुद्रुक येथील अथर्व कदम या बालवैज्ञानिकाचा सत्कार झाला. मगर म्हणाले, पाणंद रस्ते विकासासाठी ५०० मीटर रस्त्यासाठी २ लाखांचा निधी शासनाकडून मिळणार आहे. त्याचा शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.
कांडगावे म्हणाले, 'आयआरसी'तर्फे पुढील २० वर्षांसाठी रस्ते विकास आराखडा तयार केला जात आहे. या आराखड्यात ग्रामीण व इतर रस्त्यांसाठी खुल्या झालेल्या पाणंद रस्त्यांची सूचना करू शकता. त्याच्या मंजुरीसाठी तसेच नवीन रस्त्यासाठीही प्रस्ताव देण्याचे आवाहन केले.
विद्याधर गुरबे म्हणाले, पीसीआय इंडेक्सनुसार रस्त्यांचे प्राधान्यक्रम ठरवून येणारा निधी खर्च करण्यात यावा.
तालुक्यातील रस्त्यांचे काम चांगले झाले नसून, रस्ते लोकांच्या सोयीचे नव्हे, तर गैरसोयीचे बनले आहेत. याबाबत वारंवार विचारणा करूनही संबंधित अधिकारी खुलासा करत नाहीत.
५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांची शाळा सुरू झाली आहे. तरीही शाळा अस्वच्छ आहेत. त्या स्वच्छ करून घ्याव्यात तसेच गणवेशांचे वाटप करण्यात यावे, अशी सूचना विठ्ठल पाटील यांनी केली.
चर्चेत बनश्री चौगुले, इंदुमती नाईक, विजयराव पाटील यांनीही भाग घेतला. यावेळी उपसभापती इराप्पा हसुरी, प्रकाश पाटील, सहायक गटविकास अधिकारी आनंद गजगेश्वर आदींसह खातेप्रमुख उपस्थित होते.
-
* सदस्यांना टॅबचे वितरण
शासनाच्या सर्व योजनांची माहिती मिळावी व तंत्रज्ञानाचा वापर करून कामकाज सुलभ व्हावे, यासाठी सदस्यांना टॅबचे वितरण करण्यात आले. सदस्यांना टॅब वितरण करणारी गडहिंग्लज पंचायत समिती जिल्ह्यातील पहिली असल्याचे मगर यांनी सांगितले.
तालुका कोविडमुक्त
सद्यस्थितीला तालुक्यात कोविडचा एकही रुग्ण नाही. मात्र, राज्यात कोविडचे रुग्ण वाढत असल्याने पूर्वीप्रमाणेच उपजिल्हा रुग्णालयातील यंत्रणा सज्ज असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप आंबोळे यांनी सांगितले.