नवे पारगाव : बिरदेवनगर-जुने पारगाव (ता. हातकणंगले) येथील पांडुरंग नाना धुमाळ (वय १०२) यांनी आत्मविश्वास व इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनावर मात करून कोरोनापासून मुक्ती मिळविली.
बिरदेवनगरच्या पांडुरंग धुमाळ पूर्वी घरची शेती पहात. वारणा साखरला ऊस वाहतुकीसाठी त्यांची बैलगाडी होती. या वयात शेतीचे काम निभावत नसले तरी कुटुंबाला शेतीच्या कामाचे मार्गदर्शन करीत होते. काही दिवसांपूर्वी धुमाळ यांना ताप व अशक्तपणा होता. कोरोनाची चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांच्या कुटुंबीयांची कोरोना टेस्ट केल्यानंतर त्यांच्या सुनेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, त्यांना घरी विलगीकरणात उपचार केले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
पांडुरंग धुमाळ यांना वडगाव येथील धन्वंतरी कोविड सेंटरमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले होते. त्यांचा एचआरसीटी स्कोर २७ होता व ऑक्सिजन लेव्हल ७५ होती. कोविड सेंटरमध्ये कोरोना उपचारातील व्हेंटिलेटर, रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर न करता केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनावर मात केली आहे. दहा दिवसांनंतर घरी सुखरूप परतले. कुटुंबीयांनी त्यांचे औक्षण करून आनंद व्यक्त केला.
त्यांच्याशी संपर्क साधला असता, ‘‘माझा परमेश्वराच्या कृपेने माझा पुनर्जन्म झाला’’, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. धन्वंतरी कोविड सेंटरचे डॉ. रणजित पाटील, प्रथमोपचार करणारे डॉ. टी. जी. पाटील यांनी मार्गदर्शन केले.
फोटो ओळी : पारगावच्या १०२ वयाच्या पांडुरंग धुमाळ यांनी कोरोनावर मात केल्यावर कुटुंबीयांनी त्यांचे औक्षण केले.