कबनूर : येथे कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी अपर तहसीलदार शरद पाटील यांच्या सूचनेनुसार सरपंच शोभा पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना प्रतिबंधात्मक समिती यांची पंचरत्न हॉलमध्ये बैठक झाली. आज, मंगळवारी सकाळी अकरा वाजल्यापासून ते रविवार (दि. १६) पर्यंत कडकडीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सकाळी ७ ते ८ व संध्याकाळी ५ ते ६ दूध विक्री चालू राहील. तसेच मेडिकल व दवाखाने २४ तास चालू राहतील. कोणतीही आस्थापने अथवा दुकाने चालू राहणार नाहीत. नागरिकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे व शंभर टक्के लॉकडाऊन यशस्वी करण्याचे आवाहन सरपंच पवार यांनी केले.
बैठकीस पंचगंगा सहकारी कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील, उपसरपंच सुधीर पाटील, बी.डी. पाटील, जि. प. सदस्या विजया पाटील,तलाठी एस. डी. पाटील, ग्रामसेवक बी. टी. कुंभार, ग्रा.पं.सदस्य उपस्थित होते.