उल्हासनगर : थकीत वीज बिल प्रकरणी वीज पुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या इलेक्ट्रिशियनला मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी ३ वाजता वाशिठा कॉलनी येथे घडली. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४, वसिठा कॉलनी येथे राहणारे रोशन रहेजा यांच्याकडे गेल्या दोन महिन्याचे महावितरणचे वीज बिल थकले होते. महावितरणचे कर्मचारी इलमुदिन मेहबूब शेख यांच्यासह विभागाचे पथक थकबाकी वसुली व वीज जोडणी खंडित करण्यासासाठी सोमवारी दुपारी ३ वाजता गेले होते. त्यावेळी रोशन रहेजा आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यामध्ये शाब्दिक चकमक झाली.
रोशन याने थेट कर्मचाऱ्याला मारहाण केली असून मारहाणीचे संपूर्ण चित्रण मोबाईलमध्ये कैद झाले. मारहाण प्रकारणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली. तर या घटनेबाबत महावितरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासी संपर्क केला असता, त्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची माहिती दिली. मात्र नाव प्रसिद्ध करण्यास मनाई केली.