कल्याण : आपले म्हणणे ऐकत नसल्याच्या रागातून इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली ढकलुन देत मित्राची हत्या करणाऱ्या जनार्दन वर्मा उर्फ चौधरी (रा. डोंबिवली) याला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एस. बी. कचरे यांनी शनिवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेच्या घरी विनोदकुमार चौधरी व जनार्दन हे दोघे जुलै २०१६ च्या रात्री दारू पीत बसले होते.
यावेळी, या महिलेच्या घरी येण्यावरून या दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रुपांतर झटापटीत होऊन जनार्दन याने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून विनोदकुमारला खाली ढकलून दिले. यात गंभीर जखमी झालेल्या विनोदकुमारचा मृत्यू झाला. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी जनार्दनविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी पुरावे गोळा करून आरोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणात सहायक सरकारी वकील रचना भोईर यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी पोलीस हवालदार ए. आर. गोगरकर यांनी मदत केली.