डोंबिवली-छत्रपती शिवाजी महाराज यांचा डोंबिवली पूर्वेतील पुतळा गेल्या अनेक महिन्यांपासून मेघडंबरीविना उघड्या स्थितीत आहे. शिवजयंती अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली असताना देखील प्रशासनाकडून होत असलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पुतळ्याचे सुशोभीकरण अपूर्ण आहे. कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाच्या विरोधात उद्धव सेनेकडून आज पुतळ्याजवळ मूक आंदोलन करण्यात आले.
जिल्हा प्रमुख दिपेश पुंडलीक म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण जिल्हा संघटक तात्या माने, महिला जिल्हा संघटक वैशाली दरेकर, युवा जिल्हा अधिकारी प्रतीक पाटील, शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे, अभिजित सावंत यांच्यासह पदाधिकारी सुधाकर वायकोळे, संजय पाटील, प्रमोद कांबळे, राजेंद्र सावंत, नितीन पवार, शाम चोघले, प्रविण विरकुट, प्रकाश खाडे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी अभियंता मनोज सांगळे यांना जाब विचारत चांगलेच धारेवर धरले. जिल्हा प्रमुख म्हात्रे यांनी सांगितले की, महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी महापालिकेने वर्षभरापासून सुशोभीकरणाचे काम सुरू केले. ते काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. सहा महिन्यापासून महाराजांचा पुतळा मेघडंबरीविना आहे. मेघडंबरी बसविली गेली नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
दरम्यान शिंदे सेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी उद्धव सेनेच्या मूक आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, शिल्लक सेनेने स्टंटबाजी केली आहे. ज्याठिकाणी त्यांनी मूक आंदोलन केले. त्याच ठिकाणी महाराजांचा सुबकसा सुंदर पुतळा बसविला जाणार आहे. त्याचे श्रेय घेण्यासाठी शिल्लक सेनेचा हा प्रयत्न आहे. यापूर्वी मशालीचे स्मारक साफसूफ करुन त्याची पूजा अर्चा शिल्लक सेनेकडून करण्यात आली होती. त्याकडे पुन्हा ढुंकूनही पाहिले नाही.सावळाराम महाराज क्रिडा संकुलाला ५० कोटी रुपये निधीतून विकास होणार असल्याने त्याठिकाणीही शिल्लक सेनेकडून स्टंटबाजी करण्यात आली होती. त्यांचे हे प्रयत्न केविलवाणे आहेत.