मुंबई : मुंबई विद्यापीठाचा एक्स्ट्रा-म्युरल स्टडीज विभाग आणि संजीवन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कलिना विद्यापीठात प्राण्यांसाठी विशेष शिबिर राबविण्यात आले. अनेक प्राणी व पक्ष्यांना घेऊन त्यांच्या मालकांनी येथे भेट दिली. विविध जाती-प्रजातीच्या शंभरहून अधिक कुत्री, मांजरी, पोपट, कबुतर, उंदीर, ससे शिबिरात होती. पाळीव प्राण्यांच्या मालकांना येथील डॉक्टरांनी तपासले. कोणता पक्षी किंवा प्राणी आजारी आढळल्यास त्यांना योग्य उपचाराबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. व नजिकच्या प्राणी रुग्णालयात दाखविण्यास सांगितले. तसेच मालकांनी प्राण्यांच्या आरोग्याकडे, खाण्याकडे, व्यायामाकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे डॉ. उमेश करकरे यांनी माहिती दिली.या शिबिरात प्राण्यांच्या मालकांकडून शिबिराचा फायदा झाल्याची प्रतिक्रिया मिळाली. केवळ डॉक्टरांचाच सल्ला नाही, तर आलेल्या इतर हेल्थी प्राण्यांच्या मालकांकडूनही त्यांची काळजी कशाप्रकारे घेतली जाते याबद्दल समजल्याची भावना एका प्राणी मालकाने व्यक्त केली. विद्यापीठात यावेळी ८ विविध स्टॉल्सही मांडण्यात आले होते. यामध्ये प्राणी, पक्ष्यांसाठी खाणे, त्यांची एक्सेसरीज, माहिती पुस्तिका तसेच पक्षी/ प्राण्यांचे लिंग चाचपणी देखील करण्यात आली. (प्रतिनिधी)
मुंबई विद्यापीठात भरली प्राण्यांची जत्रा!
By admin | Updated: November 17, 2014 01:25 IST