जयशंकर गुप्त, कवर्धा
ज्योतिष पीठ आणि द्वारका शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी साईबाबांच्या पूजा-उपासनेला विरोध करण्यास बोलावलेल्या धर्मसंसदेत दुसºया आणि अंतिम दिवशी सोमवारी गदारोळ झाला. दोन्ही गट हमरातुमरीवर आल्यामुळे तणाव निर्माण झाला. साईभक्तांना व्यासपीठावरून उतरविणे आणि पुन्हा बळजबरीने बसविण्याचे नाट्यही रंगले. आयोजकांचे आव्हान स्वीकारून व्यासपीठावर आलेल्या दोन साईभक्तांनी शंकराचार्यांवर साईबाबांविरुद्ध निंदामोहीम चालवत हिंदू समाजात फूट पाडत असल्याचा आरोप केला. अहमदाबादहून आलेले साईभक्त स्वामी मनुष्य मित्र म्हणाले की, हिंदू, मुस्लीम, शीख, ईसाई, हम सब हैं भाई भाई’चा नारा लावला जात होता. शंकराचार्यांच्या या मोहिमेमुळे साईभक्त व शंकराचार्य यांच्यात हिंदू समाज विभागला जाईल. त्यांच्या या विधानामुळे शंकराचार्य समर्थक चांगलेच संतप्त झाले. त्यांनी साईभक्तांना धक्काबुक्की केली, कपडे फाडले, माईक हिसकावला. या दोघांना बाहेर काढले जात असताना पत्रकारांना त्यांना भेटू देण्यात आले नाही. या दोघांना परत व्यासपीठावर नेऊन महंत आणि साधूंच्या घेºयात बसविण्यात आले.