मुंबई : घर भाड्याने देण्यापूर्वी भाडेकरूंची संपूर्ण माहिती पोलीस ठाण्यामध्ये देणे आवश्यक आहे. यासाठी गेल्या काही वर्षांपासून मुंबई पोलीस जनजागृती करीत आहेत. मात्र, अनेक जण आजही पोलिसांना माहिती न देताच घर भाड्याने देतात. अशाच पाच घरमालकांवर देवनार पोलिसांनी गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली आहे.गेल्या काही वर्षांत मुंबईत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले होते. यामध्ये भाड्याने राहणाऱ्या आरोपींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. हे आरोपी परराज्यातील असल्याने एखादा गुन्हा केल्यानंतर ते पुन्हा त्यांच्या मूळ गावी पळ काढतात. त्यामुळे पोलिसांना त्यांना शोधण्यास मोठी कसरत करावी लागते. शिवाय मुंबई शहर नेहमीच अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर राहिलेले आहे. त्यामुळे घर अथवा दुकान भाड्याने देण्यापूर्वी भाडेकरूंची संपूर्ण माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात देणे अनिवार्य आहे. पोलिसांकडे या भाडेकरूचा फोटो आणि त्याची संपूर्ण माहिती असल्याने एखादा गुन्हा घडल्यास पोलीस सहज त्या आरोपीला शोधू शकतात.पोलीस गेल्या अनेक वर्षांपासून याबाबत जनजागृती करीत आहेत. मात्र, आजही अनेक जण घर अथवा दुकान भाड्याने देताना त्याची माहिती पोलिसांना देत नाहीत. अशाच प्रकारे गोवंडी परिसरात अनेक जण आपले घर अथवा दुकान कोणालाही भाड्याने देतात. देवनार पोलिसांनी याबाबत रहिवाशांना अनेकदा समज दिली. घरमालक पोलिसांच्या या जनजागृतीकडे दुर्लक्ष करीत असल्याने अखेर गेल्या महिनाभरात परिसरातील पाच घरमालकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
भाडेकरूंची माहिती न देणा-या घरमालकांवर गुन्हा
By admin | Updated: September 1, 2014 04:19 IST