स्नेहा मोरे, मुंबई व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून गुन्हेगारी वाढली अशी चर्चा होत असली, तरी याच व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सांताक्रूझ येथील रिंतू राठोड यांनी अभिनव उपक्रम यशस्वी केला आहे. काश्मीर पूरग्रस्तांना ३५ हजार थेपले पाठवून त्यांनी सामाजिक भान जपले आहे. व्हॉट्सअॅपद्वारे काही तासांतच व्हायरल झालेल्या मेसेजने रिंतू यांना हजारो व्यक्तींनी संपर्क साधला व त्यातूनच ही मोहीम राबविली आहे.व्यवसायाने कमर्शिअल डिझायनर असणाऱ्या रिंतू या केक डिझायनिंगच्या क्षेत्रात आहेत. यंदा गणपतीला त्यांनी चॉकलेट्सचे गणपती बनवून दुधात विसर्जित केले. शिवाय हे मिल्कशेक अनाथाश्रमातील मुलांना देण्यात आले. त्यानंतर काश्मीरमधील घटनेच्या धर्तीवर तेथील पूरग्रस्तांसाठी काहीतरी करावे, या विचारातून रिंतू यांनी ही मोहीम हाती घेतली.व्हॉट्सअॅपवर ‘पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रत्येकी २५ थेपले पाठविणे’ असा मेसेज पाठविला. काही तासांतच या कल्पनेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. त्यात नालासोपारा, गिरगाव, घाटकोपर, दहिसर, नेरूळ, वाळकेश्वर, बोरीवली, कांदिवली अशा वेगवेगळ््या ठिकाणांहून व्यक्तींनी रिंतू यांच्याशी संपर्क करून थेपले एकत्रित केले. त्यांनतर रिंतू यांनी आपल्या काश्मीर येथील मैत्रिणीशीही संवाद साधला. या उपक्रमाबद्दल अधिक माहितीही दिली़ त्यानंतर ‘हेल्प’ संस्थेशी संपर्क करून त्यांच्या मदतीने हे थेपले काश्मीर पूरग्रस्तांपर्यंत विमानसेवेद्वारे पोहोचविण्यात या सर्वांना यश आले. यात रिंतू यांचे पती निमेश राठोड, डॉ. कृष्णा देसाई, विनिता हुरकट या सर्वांचा महत्त्वाचा वाटा आहे.
व्हॉट्सअॅपद्वारे काश्मिरात ३५ हजार थेपले पोहोचले!
By admin | Updated: September 29, 2014 11:47 IST