लंडन : ब्रिटिश विद्यार्थिनीने एका कनवाळू बेघर व्यक्तीकरिता हजारो पौंडांची (ब्रिटिश चलन) मदत गोळा केली. डॉमिनिक हॅरिसन बेन्टझेन असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. बेघर व्यक्तीने डॉमिनिकला अडचणीच्या काळात मदतीचा हात पुढे केला होता. त्याच्या या कनवाळूपणाने भारावून जाऊन डॉमिनिकने १६ हजार ५०० पौंडांची रक्कम जमवली. बँक कार्ड गहाळ झाल्यामुळे डॉमिनिक रात्री घरी कसे जावे या विवंचनेत होती. तेव्हा याच बेघर व्यक्तीने मदतीचा हात देत स्वत:कडील अखेरची काही नाणी तिला देऊ केली होती. बेघर व्यक्तीचे हे दातृत्व पाहून डॉमिनिक भारावून गेली आणि तिने या व्यक्तीसाठी देणगी गोळा करण्याचा निर्धार केला. तिने यासाठी एक आॅनलाईन पेज तयार केले. या पेजद्वारे बुधवारपर्यंत १६ हजार ५०० पौंड एवढा निधी गोळा झाला होता. माझे बँक कार्ड गहाळ झाले होते. जवळ एक पौंडही नव्हता. अशा कठीण प्रसंगी या बेघर व्यक्तीने मला त्याच्याकडील अखेरचे तीन पौंड देऊ केले. या पैशातून टॅक्सीचे भाडे दे, असे तो म्हणाला, असे डॉमिनिकने या पेजवर लिहिले आहे. मी त्याचे पैसे घेतले नाही; परंतु दररोज तुच्छतेला तोंड देणाऱ्या या व्यक्तीच्या मनाचा मोठेपणा मला स्पर्शून गेला. रॉबी असे या बेघर व्यक्तीचे नाव असून सात महिन्यांपासून त्याला घर नाही. तो अनेकदा अडल्या नडल्यांना मदत करत असतो, असे सेंट्रल लॅन्केशायर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी बघितले होते. (वृत्तसंस्था)
कनवाळू बेघर व्यक्तीसाठी जमवली मदत
By admin | Updated: December 18, 2014 06:00 IST