कुत्र्याला फिरायला घेऊन निघालेल्या कॅमिला स्निएक (३८) यांना अटलांटिक बेटाच्या मधोमध वाहून आलेले हार्ड हॅट हेल्मेट सापडले. विशेष म्हणजे त्यांनी ते ज्याचे होते त्याला पोहोचते केले. हेल्मेटचा हा परतीचा प्रवास होता ३,७०० मैलांचा अमेरिकेत. कॅमिला या अॅझोर्स किनाऱ्यावर कुत्र्याला घेऊन फिरायला गेल्या असताना त्यांना खडकावर हे हेल्मेट दिसले. हे हेल्मेट अटलांटिक महासागराचा हजारो मैलांचा तरंगत प्रवास करून आले असेल याची त्यांना काही कल्पनाच नव्हती. त्यांनी हेल्मेटची माहिती फेसबुकवर टाकली. विश्वास बसणार नाही परंतु त्यांची ही पोस्ट तेलाच्या विहिरीवर काम करणारे जेरेमी अर्सेनिवुक्स यांच्या पाहण्यात आली. जेरेमी यांचे हे हेल्मेट मेक्सिकोच्या आखातात १८० मैलांवर हरवले होते. तेलाच्या विहिरीसाठी काम करणाऱ्या कोणी तरी या हेल्मेटचे छायाचित्र पाहिले आणि त्यावरील ‘सीकॉर मरीन’ हे बोधचिन्ह पाहिले आणि मग ही पोस्ट त्याने कामाशी संबंधित असलेल्यांच्या फेसबुक ग्रुपवर शेअर केली. हेल्मेट सापडल्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी लुईसिआनातील शोनगलू येथील जेरेमी यांनी ती पोस्ट बघितली. हेल्मेटवरील ‘जे स्मूथ’ हे त्यांचे टोपणनाव त्यांनी ओळखले. जेरेमी यांनी कॅमिला यांच्याशी संपर्क साधला व ते परत करण्याचे आश्वासन कॅमिला यांनी दिले. हेल्मेटचा मालक इतक्या लवकर सापडेल यावर माझा विश्वास बसू शकत नाही. जग खरोखर खूपच लहान आहे, असे त्या म्हणाल्या. यावर जेरेमी म्हणाले की,‘‘ते हेल्मेट ओळखता आले कारण त्यावरील स्टीकर कायम राहिले म्हणून.’’
सागरातून तरंगत आलेले हेल्मेट ३,७०० मैलांवरील मालकाला परत
By admin | Updated: April 16, 2017 00:56 IST