ऑनलाइन टीम लाहोर, दि. २५ - बकरी चोरल्याचा आरोप करत एका जमीनदाराने १० वर्षाच्या मुलाचे हात तोडल्याची घटना पाकिस्तानातील पंजाब प्रांतात घडली आहे. पोलिसांनी या जमीनदाराला अटक केली असून येथील सत्र न्यायालयाने १० दिवसांसाठी पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रसार माध्यमांनी ही घटना प्रसिद्ध केल्यावर, पंजाबचे मुख्यमंत्री शाहनवाज शरीफ यांनी या प्रकरणी पोलिसांना विचारले असता त्यांनी जमीनदाराला अटक केली. उशिराने कारवाई केली म्हणून येथील पोलीस ठाण्याच्या निरीक्षकाला मुख्य मंत्र्यांनी निलंबीत केले आहे. मुस्तफा गौस या जमीनदाराचा नासिर इकबाल यांच्यासोबत पाण्यावरून वाद झाल्याने मुस्तफाने इकबाल यांचा मुलगा तबस्सुम याचे अपहरण करून त्याचे हात तोडल्याचे नासिर इकबाल यांनी सांगितले आहे. हात तोडल्यानंतर त्या जमीनदाराने मुलाला जखमी अवस्थेतच रस्त्यावर सोडून दिले असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. या मुलाला अजीज भट्टी शहीद रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
बकरी चोरली म्हणून दहा वर्षाच्या मुलाचे हात तोडले
By admin | Updated: July 25, 2014 19:19 IST