छिंदवाडा: चित्रपट हा समाजाचा आरसा असल्याचं म्हणतात. समाजात जे घडतं, त्याचं प्रतिबिंब आपल्याला अनेकदा चित्रपटात पाहायला मिळतं. पण याच्या अगदी उलट घडलं तर? चित्रपटातली कथा प्रत्यक्षात घडू लागली तर? मध्य प्रदेशच्या छिंदवाडामध्ये घडलेल्या घटनेमुळे अनेकांना हाच प्रश्न पडला आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या एंटरटेनमेंट चित्रपटाची कहाणी छिंडवाड्यात प्रत्यक्ष घडली आहे.एक उद्योगपती आपली संपूर्ण संपत्ती इमानदार कुत्र्याच्या नावावर करतो, असं एंटरटेनमेंट चित्रपटाचं कथानक आहे. या कुत्र्याचं नाव एंटरटेनमेंट असतं. छिंदवाड्यातल्या एका गावात राहणाऱ्या शेतकऱ्यानंदेखील त्याची संपत्ती कुत्र्याच्या नावे केली आहे. या कुत्र्याचं नाव जॅकी आहे. मुलाची वर्तणूक चांगली नसल्यानं ओम नारायण वर्मा यांनी त्यांची अर्धी संपत्ती कुत्र्याच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला. जॅकी ओम नारायण यांची काळजी घेतो. तो सदैव त्यांच्यासोबत असतो. त्यामुळे वर्मा यांनी जॅकीला संपत्तीत निम्मा वाटा दिला आहे. जॅकीचा सांभाळ करणाऱ्याला त्याच्या नावे असलेली संपत्ती मिळेल, असं वर्मांनी त्यांच्या मृत्यूपत्रात लिहिलं आहे.
हर कुत्ते का दिन आता है! मध्य प्रदेशातला जॅकी अचानक बनला करोडपती
By कुणाल गवाणकर | Updated: December 31, 2020 16:35 IST