ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. ३ - जलपायगुडीजवळील एका गावामध्ये गावकीचा आदेश पाळला नाही म्हणून तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला ठार मारल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धुपगिरी भागात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून पोलीसांनी दोघांना अटक केली आहे.
सदर दुर्दैवी मुलीच्या वडिलांचा अनिल बर्मन या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याशी अनेक दिवसांचा एक वाद सुरू होता. अखेर हे प्रकरण गावकीकडे निवाड्यासाठी आले. गावकीने त्या मुलीच्या वडिलांनी ४० हजार रुपये द्यावेत त्यातले ४ हजार ताबडतोब द्यावेत तसेच एका महिन्याच्या आत गाव सोडावा असे आदेश दिले. दहावीत असलेल्या या मुलीने आपल्या वडिलांवर अन्याय होत असल्याचे सांगत गावकीविरोधात आवाज उठवला आणि हे बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे सुनावले. सोमवारी घडलेल्या या प्रकारानंतर काही वेळातच ती मुलगी गायब झाली आणि मंगळवारी सकाळी काही अंतरावर तिचे नग्नावस्थेतील शव सापडले. अनिल बर्मन व सुनील बर्म या दोघांना अटक करण्यात आली असून आणखी १३ जणांना आरोपी करण्यात आहे ज्यामध्ये तृणमूलच्या माजी नगरसेवकाचा समावेश आहे.