नवी दिल्ली : केंद्रीय दक्षता आयोगाकडे भ्रष्टाचारासंबंधी २०१४ मध्ये ६३ हजारांपेक्षा जास्त तक्रारी आल्या असून, त्याआधीच्या वर्षाच्या म्हणजे २०१३ च्या तुलनेत ही संख्या ७९ टक्के जास्त आहे. गेल्या वर्षी ६३,२८८ तक्रारी आल्या होत्या. २०१३ मध्ये ही संख्या ३५,३३२ एवढी होती. गेल्या वर्षी आयोगाकडे भ्रष्टाचारासंबंधी आलेल्या तक्रारींचा उच्चांक नोंदला गेला होता. या सर्व तक्रारींचा निर्धारित मुदतीत निपटारा करण्यात आला. या तक्रारी केंद्राच्या विविध मंत्रालय व विभागांच्या भ्रष्टाचाराशी संबंधित होत्या. गेल्या वर्षी सीव्हीसीने दरमहा तयार केलेल्या अहवालाच्या आधारावर ही संख्या निश्चित करण्यात आली. दरवर्षी जूनमध्ये ती संसदेत सादर केल्यानंतर सार्वजनिक केली जाते. ठोस पुराव्यांचा अभाव बहुतांश तक्रारी ठोस पुराव्यांअभावी निकाली काढण्यात आल्या. भ्रष्टाचार संपविण्याच्या धोरणानुसार या तक्रारींची नोंद झाली. उर्वरित तक्रारी आवश्यक कार्यवाहीसाठी, तसेच त्यासंबंधी अहवालासाठी संबंधित मुख्य दक्षता अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आल्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)
भ्रष्टाचाराच्या तक्रारींत ७९ % वाढ
By admin | Updated: February 15, 2015 23:43 IST