ऑनलाइन टीमअहमदाबाद, दि. २३ - फॉर्म्यूल वन स्पर्धेप्रमाणे भरधाव वेगाने गाडी चालवण्याची तेरा वर्षाच्या मुलाची हौस तिघांच्या जीवावर बेतली आहे. या मुलाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याने गाडी रस्त्यावर झोपलेल्या तिघांच्या अंगावरुन नेली.
अहमदाबाद येथे एका १३ वर्षाच्या मुलाने घरच्यांची नजर चुकवून घरातील ह्यूंडाई आय २० ही गाडी घराबाहेर नेली. ताशी १२० किलोमीटर या वेगाने तो गाडी पळवत होता. मात्र भरधाव वेगातील गाडीवर त्याला नियंत्रण ठेवणे जमले नाही व त्याने गाडी फुटपाथवर चढवली. यात फुटपाथवर झोपलेल्या तिघा जणांच्या अंगावरुन गाडी गेल्याने तिघांचा मृत्यू झाला. तर आणखी तिघे जण जखमी झाली. या अपघातानंतर त्या मुलाने गाडीतून पळ काढण्याचा प्रयत्नही केला मात्र प्रत्यक्षदर्शींनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यामुलाने यापूर्वीही घरातून गाडी बाहेर नेली होती. याविषयी स्थानिकांनी तक्रार केल्यावर आईवडिलांनी त्याला गाडी न चालवण्याची तंबी दिली होती. मात्र आईवडिलांच्या म्हणण्याकडे त्याने दुर्लक्ष केले व बुधवारी हा भीषण अपघात घडला.