जळगाव : फुले मार्केटमध्ये मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता दोन गटात तुफान हाणामारी झाली. यात भांडण सोडविण्यासाठी आलेल्या २५ वर्षीय तरुणाला जबर मारहाण झाली, त्यात त्याचे नाक व कान फ्रॅक्चर झाले असून गुप्तांगालाही दुखापत झाली आहे. त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्राथमिक उपचारानंतर खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
फुले मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्या दोन तरुणांमध्ये वाद झाल्यानंतर दोन्ही तरुणांच्या समर्थनार्थ दोन गुन्हेगारी टोळ्यांनी यात एन्ट्री केली. मित्राला मारहाण होत असल्याचे पाहून बळीराम पेठेत भाजी विक्री करणारा तरुण भांडण सोडविण्यासाठी आला असता तो दुसऱ्या गटाचा असल्याच्या संशयावरून त्यालाच या टोळक्याने मारहाण केली. त्यात त्याचे नाक फ्रॅक्चर झाले. दरम्यान, सायंकाळी जिल्हा रुग्णालयात दोन्ही गट समोरासमोर आले होते. याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आलेली नाही, परंतु आपसात वाद मिटविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.