जळगाव : तालुक्यातील धानोरा शिवारात असलेल्या कांताई बंधाऱ्यात पोहताना आकाश चंद्रकांत पाटील (वय २१,मयूर कॉलनी, पिंप्राळा मुळ रा.साकेगाव,ता.भुसावळ) हा तरुण बुडाल्याची घटना रविवारी दुपारी साडे वाजता घडली. दरम्यान, त्याच्या शोधार्थ तब्बल पाच तास मोहिम चालली, रात्री आठ वाजता मनपाच्या पथकाला तो सापडला.
घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सुट्टी असल्याने आकाश पाटील हा त्याच्या मित्रांसोबत कांताई बंधाऱ्याकडे फिरण्यासाठी गेला होता. तेथे सोबतचे मित्र बंधाऱ्यात पोहायला लागले. आकाशाला पोहता येत नसल्याने काही सहकाऱ्यांनी त्याला कमरेला प्लास्टिकची कॅन बांधून बंधाऱ्यात उतरवले. ४० क्रमांकाच्या खिडकीजवळ पोहत असताना त्यावेळी एका जणांने ही कॅन मागितल्याने त्याने त्याला ती दिली. आणि काही क्षणातच उलटा पोहत असताना तो खिडकीच्या कपाऱ्यात गेला. आकाश पाण्यात बुडाल्याचे मित्रांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही. याबाबतची माहिती तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर हवालदार सतीश हळणोर, प्रवीण हिवराळे ,सुशील पाटील व तलाठी सारिका दुरगुळे आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गावकर्यांच्या मदतीने त्यांनी तरुणाचा शोध घेतला मात्र तरीही उपयोग झाला नाही. सायंकाळी सात वाजता महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. त्यांनीही बराच वेळ शोध घेतला. शेवटी रात्री आठ वाजता त्याचा मृतदेह आढळून आला. तेथून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पदवीच्या शेवटच्या वर्षाला
आकाश हा नूतन मराठा महाविद्यालयात पदवीच्या शेवटच्या वर्षाला होता. लहानपणापासूनच तो पिंप्राळ्यातील मयूर कॉलनीत आजी सुनंदा प्रकाश पाटील व मावशी यांच्याकडे वास्तव्याला होता. वडील चंद्रकांत वसंत पाटील, आई मनिषा व बहिणी अश्विनी हे साकेगाव येथे असतात. वडील साकेगाव ते भुसावळ रिक्षा चालवतात. बहीण आश्विनी पदवीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे.
तरुण बुडाला तरी नागरिक आनंद लुटण्यात व्यस्त
बंधाऱ्यात तरुण मुलगा बुडाला..त्याचे मित्र आक्रोश करताहेत, काही जण त्याचा शोध घेताहेत असे असताना तेथे शेकडोच्या संख्येने नागरिक सहकुटुंब आनंद लुटत होते. कोणी बंधाऱ्यावर सेल्फी काढत होते तर कोणी आंब्याच्या बागांमध्ये फोटो सेशन करीत होते. काही जण बागेत जेवण करीत होते. चारचाकी, दुचाकीने अनेक जण येथे आले होते. किमान तीनशेच्या जवळपास नागरिक तेथे होते.