जळगाव : तालुक्यातील शिरसोली प्र.बो. येथे समाधान कडू बारी (वय ३४) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, गेल्या तीन दिवसातील सलग तिसरी घटना आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नातेवाइकांकडून मिळालेली माहिती अशी की, समाधान कडू बारी हा तरुण पत्नी दीपाली व मुलगा दुर्गेशसह वास्तव्याला होता. शेतीचे व मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. गावात त्याचे दुसरे घर आहे. त्याच ठिकाणी रात्री झोपायला जायचा. बुधवारी सकाळी तो घरी येऊन आंघोळ करून पुन्हा दुसऱ्या घरी गेला. बराच वेळ झाल्यानंतर घरी न आल्याने कुटुंबातील सदस्य सकाळी ७ वाजता दुसऱ्या घरी गेले असता समाधान याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. मृतदेह तातडीने खाली उतरवून जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. समाधान याच्या पश्चात आई अंजनाबाई बारी, पत्नी दीपाली, सहा वर्षांचा मुलगा दुर्गेश, लहान भाऊ असा परिवार आहे. या घटनेची एमआयडीसी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
..अशा आहेत तीन दिवसातील घटना
देवीदास प्रकाश गायकवाड (शिरसोली प्र.न.) या तरुणाने मंगळवारी रोजी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली, तर विशाल सुभाष पाटील (शिरसोली प्र.न.) या तरुणाने सोमवारी बेरोजगारीमुळे आत्महत्या केली. बुधवारी समाधान कडू बारी (रा.शिरसोली प्र.न) या तरुणाने आत्महत्या केली. तिघांनी गळफास घेऊनच जीवन संपविले आहे.