जळगाव : रिक्षाला अडथळा ठरणारा दगड बाजूला करण्याच्या कारणावरून साजीद इस्हाक खाटीक, आवेश इकबाल खाटीक, शोएब नईम खाटीक व जफर नईम खाटीक या चौघांनी युसुम मुसा खाटीक व त्यांच्या दोघा मुलांना मारहाण केली तर शोएब याने चिकन कापण्याच्या सुऱ्याने डोक्यावर हल्ला केला. ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता तांबापुरात घडलेल्या या घटनेप्रकरणी सोमवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
युसुफ खाटीक यांचे दोन्ही मुले रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात. ११ ऑगस्ट रोजी मोहसीन खाटीक याने त्याची रिक्षा घराच्या बाहेर इलेक्ट्रिक पोलजवळ लावलेली असताना शोएब नईम खाटीक याने दगड रिक्षाच्या बाजूला ठेवला. दगडामुळे रिक्षाला कट लागतो, हा दगड बाजूला ठेव असे मोहसीन याने सांगितले असता त्याला शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यावेळी वरील चौघांनी धाव घेऊन मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी शोएब याने मोहसीनच्या भावावर सुऱ्याने हल्ला केला. यात वडील, आई व भाऊ असे तिघे जण जखमी झाले. रविवारी तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर पोलिसांनी जबाब नोंदविला व त्यानुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.