जळगाव : वाचक हा आपोआप निर्माण होत नसतो, तर तो घडवावा लागतो. वाचनाचा संस्कार रुजवणे ही आजच्या काळाची नितांत गरज आहे आणि हे काम परिवर्तन करित आहे. तर `परिवर्तन पुस्तक भिशी` या सारखे उपक्रम गावागावात निर्माण होण्याची गरज आहे. असे मत ज्येष्ठ कादंबरीकार राजन गवस यांनी 'परिवर्तन पुस्तक भिशी'च्या कार्यक्रमात मांडले. यावेळी गवस यांनी वाचन, समाज, शिक्षण पद्धती याविषयी परखड मते मांडली.
या कार्यक्रमात प्रा. मनोज पाटील यांनी, त्यांच्या वाचनाच्या प्रवासाविषयी व रंगनाथ पठारे यांच्या `दिवे गेलेले दिवस` या कादंबरीचा परिचय करून दिला. तर मंजुषा भिडे यांनी राजन गवस यांच्या `तणकट`या कादंबरीचा परिचय करून दिला. या पुढे, राजन गवस यांनी सांगितले की, आपल्या वाचनाची पहिली पायरी लहान पुस्तकं व गोष्टींची पुस्तकं आहे. त्यातून गंभीर वाचनाकडे जाता येतं. प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी आमची गाठ पुस्तकांशी घालून दिली होती. मात्र, आज शिकलेले पालक हे मुलांचं जीवन घडवत नसून, बिघडवत असल्याचे मत व्यक्त केले. प्रास्ताविक ज्योती राणे यांनी तर सुत्रसंचालन ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले.