लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेतील नगररचना विभागात अनेक दिवसांपासून बांधकाम मंजुरीच्या फायलींचा निपटारा होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. नगररचना विभागात अनेक दिवसांपासून फायली प्रलंबित ठेवल्या जात असून, संपूर्ण विभागाचे कामच रामभरोसे सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. बांधकाम मंजुरीसाठी नागरिक व बांधकाम व्यावसायिकदेखील सतरा मजलीच्या चकरा मारून वैतागले आहेत. याबाबत सत्ताधाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
नगररचना विभागात मध्यंतरी ऑनलाइन मंजुरीची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली होती. मात्र, ऑनलाइन मंजुरीची प्रक्रिया तब्बल सहा महिन्यांपासून बंद पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांना मंजुरीसाठी थेट महापालिकेत यावे लागत आहे. त्यात या विभागात कर्मचाऱ्यांची रिक्त पदे असल्याने एका फाइलच्या मंजुरीसाठी नागरिकांना पंधरा-पंधरा दिवस महापालिकेत चकरा माराव्या लागत आहेत. शहरातील बांधकाम मंजुरीसह अन्य प्रकरणांच्या फायली वाढल्या आहेत. प्रत्येक रचना सहायकाकडे प्रकरणांचे गठ्ठे साचले आहेत. गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीकरिता लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. या कालावधीत एकाच ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी बांधकाम बंद होते. त्यामुळे मजूरवर्गही गावोगावी निघून गेले होते. त्याचा परिणाम बांधकामांवर तसेच प्रकरणे मंजुरीवर झाला होता. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून परिस्थिती सुधारत असल्याने बांधकामांना मंजुरी मिळावी म्हणून प्रस्ताव दाखल केले जात आहेत.