पहूर पोलिसांत परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल
पहूर, ता. जामनेर : वाकोद येथे शेतमालकासह भाऊ, बहीण, आई यांना मारहाण करण्यात आली, तसेच दोन तोळे सोन्याची साखळी हिसकावून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पहूर पोलिसात दरोडा व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेत पहिल्या गटाने शनिवारी ॲट्राॅसिटीचा, तर दुसऱ्या
गटाकडून रात्री उशिरा दरोडा, विनयभंग असा गुन्हा दाखल केल्याने
परस्परांविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या
माहितीनुसार दुसऱ्या गटातील तक्रारदार संतोषी अजय शर्मा (रा. पुणे चिंचवड) यांचे भाऊ मयूर रामप्रसाद शर्मा यांनी वाकोद शिवारातील ११५/१/१ अ गट क्रमांकातील सहा हेक्टर ६१ आर क्षेत्रापैकी एक हेक्टर २० आर जमीन संगीता रामराव पाटील यांच्या कडून २०२० मध्ये खरेदी केली आहे. शेतात आई मंगला व मयूर शर्मा हे मशागतीचे काम २८ रोजी दुपारी करीत होते. यादरम्यान अजय रामराव पांढरे, अमोल रामराव पांढरे, संजय आनंदा निकाळजे, संगीता रामराव पांढरे, दीपा अजय पांढरे यांच्यासह दोन अनोळखी व्यक्तींनी शेतात अनधिकृत प्रवेश केला व भाऊ मयूर, आई मंगला तक्रारदार संतोषी शर्मा यांना मारहाण केली, तसेच अजय पांढरे याने विनयभंग केला. गळ्यातील नव्वद हजार रुपये किमतीची दोन तोळे वजनाची सोन्याची साखळी बळजबरीने काढून पळ काढला, असे फिर्यादीत म्हटले आहे. तपास पाचोरा विभागाचे डीवायएसपी भरत काकडे करीत आहेत.