जळगाव : इंडिया फस्ट लाइन इन्शुरन्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगून पॉलिसी बंद केल्यास जादा रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवत नित्यानंद नगरातील रहिवासी प्रतिभा नरेंद्र सपकाळे या महिला बँक कर्मचाऱ्याला एकाने ६६ हजार ५५२ रुपयांत फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी महिला बँक कर्मचारीच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहाडी रोडवरील नित्यानंद नगरात प्रतिभा नरेंद्र सपकाळे या वास्तव्यास असून, त्या एका बँकेत नोकरीला आहेत. २८ जून रोजी सकाळी त्यांना संतोष देशपांडे नामक व्यक्तीचा फोन आला. त्याने आपण इंडिया फस्ट लाइन इन्शुरन्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगून सपकाळे यांना त्यांच्या पॉलिसीबाबत विचारणा करून तुम्हाला ही पॉलिसी पुढे सुरू ठेवायची आहे का ?, की बंद करायची आहे, याबाबत विचारणा केली. नंतर पॉलिसी बंद केल्यानंतर किती फायदा होणार, याचीही माहिती त्या व्यक्तीने महिलेला पाठविली. सपकाळे यांनी पॉलिसी बंद करण्यास तयार असल्याचे सांगताच, त्या व्यक्तीने तुम्ही दोन वार्षिक प्रीमियम भरल्यावर तुमच्या पॉलिसीची ७ लाख ७४ हजार ४८ रुपये रक्कम व दोन्ही प्रीमियम तुम्हाला मिळेल, असे सांगून एनईएफटी करा व प्रीमियमचे पैसे पाठवा, असे सांगितले.
फाॅर्म घेतले भरून..
त्या इन्शुरन्स कंपनीतील व्यक्तीला प्रतिभा सपकाळे यांनी बँकेची माहिती पाठविली. नंतर चेकद्वारे पैसे पाठविले़ २९ जून रोजी त्या व्यक्तीने महिलेकडून इंडिया फस्ट इन्शुरन्स कंपनीचा फॉर्म भरून घेतला. नंतर पुन्हा ३० जून रोजी देशपांडे नामक व्यक्तीचा सपकाळे यांना पुन्हा फोन आला. त्याने दुसरा वार्षिक प्रीमियम दिलेल्या बँक डिटेल्सवर लवकरात लवकर पाठविण्याचे सांगितले. त्यानुसार महिलेने दुसरा प्रीमियमदेखील पाठविला. पुन्हा महिलेने १ जुलै रोजी ३० हजार रुपये पाठवून आता आपल्याकडे पैसे नाही़, त्यामुळे पॉलिसीची रक्कम तत्काळ पाठविण्याची विनंती केली.
वारंवार संपर्क साधूनही फोन येत होता बंद
इन्शुरन्स कंपनीतील संतोष देशपांडे याने पॉलिसी रक्कम कधी मिळणार, याबाबत सोमवारी कळवितो, असे सांगितल्यानंतर २ जुलै रोजी महिलेने त्या व्यक्तीस संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र फोन बंद येत होता. वारंवार संपर्क साधूनही होत नसल्यामुळे अखेर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
असा कुठलाही व्यक्ती कंपनीत नाही
दरम्यान, सपकाळे यांनी पॉलिसी कंपनीत संपर्क साधल्यानंतर त्यांनी संतोष देशपांडे नामक व्यक्तीबाबत विचारणा केली; मात्र अशी कुठलीही व्यक्ती कंपनीत नसल्याचे सांगितल्यानंतर त्यांना आपली ६६ हजार ५५२ रुपयात फसवणूक झाल्याची खात्री झाली. गुरुवारी त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यानुसार संतोष देशपांडे नामक व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.