अखेर पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी सूर्योदयापूर्वी पोळ्याच्या पहाटे गावठीवर सिनेस्टाइल पिठोरी अमावास्या गाजवून कारवाईचा फास आवळला आहे. यामुळे गावठीवाल्यांबरोबर व मद्यपींची दाणादाण झाली. याप्रकरणी महिलेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहूर पेठ व कसबे दोन्ही गावांच्या मध्यवर्ती व रहदारीच्या प्रमुख रस्त्यावर वाघूर नदीच्या पुलाखाली गावठी दारूचा अवैधरीत्या अड्डा चालत होता. पुलाखाली गावठीच्या फुग्यांचा खच पडल्याचे नेहमी दिसून येते. येणाऱ्या -जाणाऱ्या नागरिकांसह महिलांना मनस्ताप सहन करावा लागत होता. अनेकवेळा यावरून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून आले. तत्कालीन पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी याविरुद्ध वेळोवेळी कारवाई अस्त्र काढले; पण फरक पडला नाही. नवनियुक्त पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी संबंधित अंमलदारांना कारवाईची माहिती कळू न देता गोपनीयता बाळगून सोमवारी सकाळी सहा वाजता पोलीस कर्मचाऱ्यांचे बळ न घेता पायी येऊन वन मँन आर्मी पध्दतीने गावठी अड्ड्यावर हल्लाबोल केला. धडाकेबाज कारवाईने संबंधित दारूविक्रेते फरार झाले. अड्ड्यावरील नऊ लिटर गावठीचे फुगे व बाटल्या धनवडे यांनी फोडून अड्डा उद्ध्वस्त केला. कारवाई करण्यापूर्वी वाघूर नदीच्या पुलावरील संरक्षक भिंतीवरून सिनेस्टाइल उडी घेत अड्ड्याला लक्ष्य केले. गेल्या कित्येक वर्षांपासून अड्डा चालतोय, पण काही पोलिसांशी अर्थपूर्ण व्यवहारांमुळे अधिकाऱ्यांच्या कारवाईचा धाक उरला नसल्याने अवैध धंद्यांना अभय मिळत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. धनवडे यांच्या धाडसी कारवाईचे कौतुक होत असले तरी सातत्य कितपत राहते याकडे लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे धनवडे यांनी कारवाई केल्यानंतर कसबे गावात पायी फिरून अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्या संबधितांना कडक कारवाईचा दम भरल्याचे सांगितले जात आहे. कारवाईच्या काही तासात पुन्हा गावठी विक्री झाल्याचे या ठिकाणी दिसून आले. स्वतः धनवडे या अधिकाऱ्याला कारवाईसाठी रस्त्यावर उतरावे लागल्याने संबंधित बीट अंमलदाराची जबाबदारी काय, असा प्रश्न यानिमित्ताने उभा राहिला आहे. पुन्हा गावठी भर रस्त्यावर विक्री होणे पोलिसांच्या खाकीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनच्या पाचशे मीटर अंतरावर गावठी विक्री चालते. नेहमी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. याकडे धनवडे यांनी लक्ष देण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या फिर्यादीवरून अवैध दारू विक्री करणाऱ्या उषाबाई प्रकाश जाधव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पोळ्याची जनजागृती
सकाळपासून दिवसभर पहूरसह परसरातील संवेदनशील गावांत पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी स्वतः जाऊन लाऊडस्पीकरव्दारे पोळा सण साजरा करताना घ्यावयाची काळजी व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली होणार नाही यासाठी आवाहन केले.