कोरोनामुळे महावितरणची घरगुती, वाणिज्य, औद्योगिक, कृषी व इतर ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी जमा झाली आहे. यामध्ये सर्वांधिक थकबाकी कृषिपंपाची आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने गेल्या महिन्यात २६ जानेवारीपासून नवीन कृषिपंप वीज धोरण अंमलात आणले आहे. या धोरणा अंतर्गंत शेतकरी बांधवांना कृषिपंपाची थकबाकी भरण्यासाठी महा कृषी ऊर्जा अभियानांतर्गत विविध सवलती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार पहिल्या वर्षी थकबाकी भरणाऱ्या कृषिपंप शेतकऱ्यांना सुधारित मूळ थकबाकीवर ५० टक्के सवलत देण्यात येत असून, व्याज व विलंब आकार पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या वर्षी थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांच्या सुधारित मूळ थकबाकीवर ३० टक्के तर तिसऱ्या वर्षी थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांच्या मूळ थकबाकीवर २०टक्के सवलत मिळणार आहे. तर या अभियानाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे सप्टेंबर २०१५ पूर्वीच्या थकबाकीवरील सर्व व्याज व विलंब आकार माफ होणार आहे. तसेच सप्टेंबर २०१५ नंतरच्या थकबाकीवरील विलंब आकार पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे.
सर्वाधिक थकबाकी भरली जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी
महावितरणच्या या महा कृषी उर्जा अभियानाचा लाभ घेऊन जळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक ११ हजार २७ शेतकऱ्यांनी थकीत वीजबिलाचा भरणा केला आहे. यातून १२ कोटी ८१ लाखांचा महसूल महावितरणच्या तिजोरीत जमा झाला आहे. त्या खालोखाल धुळे जिल्ह्यातील १० हजार ३९१ शेतकऱ्यांनी बिलाचा भरणा केला आहे. यातून ६ कोटी १० लाखांचा महसूल जमा झाला आहे. तर नंदुरबार जिल्ह्यातील ४ हजार ९७६ शेतकऱ्यांनी भरलेल्या वीज बिलातून ५ कोटी ८५ लाखांचा महसूल महावितरणच्या तिजोरीत जमा झाला आहे.