लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - लेवा एज्युकेशन युनियन संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाची रविवारी पार पडलेल्या सभेत सर्वानुमते प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांची लेवा एज्युकेशन युनियनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
डॉ. सुभाष चौधरी यांनी लेवा एज्युकेशन युनियन अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे अध्यक्षपदाच्या रिक्त जागेसाठी निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता; मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांच्या नावाची चर्चा होती. अखेर १३ डिसेंबर रोजी लेवा एज्युकेशन युनियन संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाची सभा पार पडली. यामध्ये बेंडाळे यांची लेवा एज्युकेशन युनियनच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. दरम्यान, संस्थेची सातत्याने भरभराट होत असून, भविष्यात या संस्थेला स्वायत्त संस्था करण्याचा मानस आहे. संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मुलींना विविध कौशल्य आधारित शिक्षण देऊन त्यांना स्वत:चा उद्योग सुरू करता यावा, यासाठी केंद्र सरकार, विद्यापीठ अनुदान आयोग, राज्य सरकार आणि इतर संस्थांच्या या माध्यमातून नवनवीन कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम सुरू होतील, असे त्यांनी निवडीनंतर सांगितले.