पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश याची पत्नी काही दिवसांपासून माहेरी गेलेली आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता भाऊ भारत हा कामावरून घरी आला तेव्हा योगेश घराबाहेर पडला. जाताना कुठे चाललो, काय काम आहे याबाबत त्याने कोणालाच काही सांगितले नाही. रात्री अकरा वाजता एका तरुणाने धावत्या रेल्वेसमोर झोकून दिल्याची माहिती रेल्वेकडून मिळाल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्याचे सुशील चौधरी व प्रवीण जगदाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. खिशातील कागदपत्रे व नातेवाइकांकडून शोध घेतला जात असतानाच त्याची ओळख पटली. योगेश हा मनपाच्या मलेरिया विभागात कार्यरत होता. त्याच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे.
दरम्यान, योगेश याच्या पश्चात पत्नी डिंपल, मुलगा कुणाल (वय ११), पवन (६), आई सिंधूबाई, भाऊ भारत व अनिल असा परिवार आहे. पंचनामा व शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.