लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आठवडाभराची सहनशीलता संपली व अखेर पदभार घ्यावा लागला, असे सांगत नागपूर येथील डॉ. मिलिंद फुलपाटील सोमवारी सकाळी दहा वाजता अधिष्ठातांच्या खुर्चीवर विराजमान झाले. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद हे यावेळी निवासस्थानी थांबून होते. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या या गोंधळात अधिकच भर पडली. आपण शासकीय नियमानुसार पदभार घेतल्याचे डॉ. फुलपाटील यांचे म्हणणे असून याबाबत वैद्यकीय शिक्षण संचालकांकडे मार्गदर्शन मागविल्याचे डॉ. रामानंद यांनी सांगितले. मात्र, सोमवारी हा किस्सा खुर्चीका तर रंगलाच. मात्र, काही राजकीय पदाधिकाऱ्यांनीही विरोध दर्शविल्याने काहीसा तणावही निर्माण झाला होता.
गणेशोत्सवाच्या सुट्टीत डॉ. जयप्रकाश रामानंद व डॉ. मिलिंद फुलपाटील दोघेही रजेवर गेल्याने डॉ. किशोर इंगोले यांच्याकडे प्रभारी पदभार देण्यात आला होता. डॉ. मिलिंद फुलपाटील सोमवारी सकाळी जळगावात परतले व त्यांनी सकाळी दहा वाजता थेट पदभार घेतला. त्यांनी पदभार घेतल्यानंतर काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत विरोध दर्शविला.
काय म्हणाले डॉ. फुलपाटील
मी शासनाच्या आदेशाचे पालन करतोय, गेल्या तीन ते चारवेळा मी डॉ. रामानंद यांना पदभार द्या, अशी रिक्वेस्ट केली होती. मात्र, त्यांनी पालकमंत्र्यांचा निरोप असल्याचे कारण सांगितले होते. मी आठवडाभर वाट पाहिली. वरिष्ठांशी चर्चा केली. त्यांच्या निर्देशाप्रमाणे पदभार स्वत:हून स्वीकारला. त्यांनी पदभार देणे अपेक्षित होते. याबाबत सचिवांशी चर्चा केली. गेल्या आठवडाभरापासून मी नियमित कार्यालयीन वेळेत उपस्थित राहत होतो.
काय म्हणाले डॉ. रामानंद
जळगावात ज्या पदावर डॉ. मिलिंद फुलपाटील यांची बदली झाली आहे. ते पदच रिक्त नसून ते ७ तारखेला आल्यानंतर त्यांनी लिहून दिल्यानंतर आम्ही याबाबत वैद्यकीय शिक्षण संचालकांना पत्र पाठवून मार्गदर्शन मागविले आहे. ते अद्याप आलेले नाही.
काय आहे प्रकरण
नागपूर येथील शरीररचनाशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मिलिंद फुलपाटील यांची जळगावात शरीरचनाशास्त्र विभागाच्या प्राध्यापक या रिक्त पदी २६ ऑगस्ट रोजी बदली झाली.
- ही बदली करताना त्यांनी अतिरिक्त कार्यभार म्हणून अधिष्ठाता पदाची जबाबदारी सांभाळावी, असे बदली आदेशात वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सहसचिव शिवाजी पाटकणकर यांनी नमूद केले होते.
- डॉ. फुलपाटील हे रुजू झाल्यानंतर डॉ. रामानंद यांनी त्यांच्याकडे अधिष्ठाता पदाचा पदभार तत्काळ सोपवावा, असेही आदेशात म्हटले आहे.
गोंधळ काय?
- डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी याबाबत मार्गदर्शन मागविले असून त्यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, डॉ. मिलिंद फुलपाटील यांची ज्या पदावर बदली झाली आहे, त्या पदावर आधीच डॉ. अरुण कासोटे हे कार्यरत आहेत. हे पद रिक्त नसल्याने याबाबत मार्गदर्शन मिळावे.
- मात्र, सोमवारपर्यंत अद्याप याबाबत मार्गदर्शन मिळालेले नव्हते.
- डॉ. मिलिंद फुलपाटील यांनी ७ सप्टेंबरला जळगावात आल्यानंतर आपण अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार घेत असल्याचे लेखी दिले आहे. त्यांनी वैद्यकीय शिक्षण संचालकांनाही कळविले आहे.