जळगाव : बीएचआरमधील अपहार व फसवणूक प्रकरणात मुख्य सूत्रधार अवसायक जितेेंद्र कंडारे व सुनील झंवर हे अद्यापही पोलिसांना सापडलेले नाहीत. झंवर हा वेशांतर करून जळगाव, इंदूर व उज्जैन येथे वावरत असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत असली तरी तपासी यंत्रणा पुण्यात त्याशिवाय न्यायालयाने अद्याप त्यांना फरारही केलेले नाही, त्यामुळे जळगावात झंवर असो की कंडारे यांना अटक करणार तरी कोण? असाच सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
नोव्हेंबर महिन्यात पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर जळगावात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाडसत्र राबविले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संस्थेचा सनदी लेखाधिकारी धरम किशोर सांखला (४०, रा.शिव कॉलनी), महावीर मानकचंद जैन (३७, रा.गुड्डूराजानगर), ठेवीदार संघटनेचा अध्यक्ष विवेक देवीदास ठाकरे (४५, रा.देवेंद्रनगर) सुजित सुभाष बाविस्कर (वय ४२, रा.पिंप्राळा) व कंडारेचा वाहनचालक कमलाकर भिकाजी कोळी (२८, रा. के. सी. पार्कमागे, जळगाव) या पाच जणांना अटक करण्यात आली होती. जितेंद्र कंडारे, माहेश्वरी, प्रकाश वाणी, कुणाल शहा, सुनील झंवर यांना अद्याप अटक झालेली नाही. प्रकाश वाणी यांना अटकपूर्व जामीन मंजूर आहे.
मांजरीच्या गळ्यात घंटा बांधणार कोण?
सुनील झंवर जळगाव शहरात आला व पोलिसांना दिसला तरी त्याला अटक करणार कोण?, झंवर याचे सर्वच राजकीय पक्ष, त्यांचे नेते, मंत्री, आमदार यांच्याशी संबंध आहेत. गुन्हा पुण्यात असल्याचे कारण करून अटक करण्यातच टाळाटाळ स्थानिक यंत्रणेकडून केली जाते. याआधीदेखील पोलिसांना पाहिजे असलेले राजकीय वलय असलेले संशयित आरोपी खुलेआम फिरूनही त्यांना अटक करण्याची हिंमत यंत्रणेने दाखविली नव्हती. इतकेच काय हद्दपार गुन्हेगारदेखील शहरात फिरत असताना तो आपल्या पोलीस ठाण्याचा नाही ना?, उगाचच कटकट म्हणून यंत्रणा बॅकफूटवर जाते.
कायदा काय म्हणतो
एखाद्या गुन्ह्यात तपास सुरू आहे व दोषारोप पत्र न्यायालयात दाखल झालेले नाही, तोपर्यंत गुन्ह्यातील संशयित आरोपी पोलिसांना मिळून येत नसेल तर फरार घोषित करता येत नाही. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतरही आरोपी मिळून येत नसल्यास पोलीस न्यायालयाकडे त्याला फरार घोषित करण्याची विनंती करू शकतात व त्याबाबत न्यायालय आदेश काढते. बीएचआर गुन्हा हा अजून तपासावर आहे, त्यामुळे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. असे असताना सुनील झंवर व जितेंद्र कंडारे यांना फरार घोषित करता येणार नाही. तपासी यंत्रणा पुण्यात असली तरी स्थानिक पोलीसही दिसताक्षणी अटक करू शकतात, अशी माहिती जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी ‘लोकमत’ ला दिली.