लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेत जरी सत्तांतर झाले असले तरी जळगावकरांच्या समस्या मात्र ज्या होत्या त्याच समस्या आजही कायम आहेत. शहरातील रस्त्यांच्या समस्यांवर सत्ताधाऱ्यांना व प्रशासनाला प्रश्न विचारण्याची हिंमत कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षाची होताना दिसून येत नाही. भाजपच्या काळात आंदोलन करणारी राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीतील पक्ष सत्तेत आल्यामुळे आंदोलन करावे की नाही? या विवंचनेत आहे. तर मनपातील भाजपदेखील आपली मनपातील सत्ता गेल्याचा विरहातून अजूनही बाहेर येताना दिसून येत नाही.
जळगाकर मात्र आपल्या नशिबालाच दोष देऊन शहरातील जीवघेण्या रस्त्यांवरून मार्ग काढताना दिसून येत आहे. शहरातील नागरिकांना कर भरून देखील मनपा प्रशासनाकडून ज्या आवश्यक मूलभूत सुविधा भेटायला पाहिजेत त्या समस्यांपासून नागरिक वंचित राहत असतानाही एकाही पक्षाचा पदाधिकारी या समस्या प्रशासन व सत्ताधाऱ्यांसमोर मांडायला समोर येताना दिसून येत नाही.
ढीगभर समस्या, उपाययोजना मात्र नाही
१. शहरातील ९० टक्के रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.
२. चिखल व खड्ड्यांमुळे रस्त्यांवरून पायी चालणेही कठीण आहे.
३. शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम अडीच वर्षांपासून सुरूच असून, प्रत्यक्षात काम केव्हा पूर्ण होईल हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही.
४. पुलाचे काम होत नसल्याने अडीच वर्षांपासून ३ ते ६ कि.मी.चा फेरा घालून नागरिक शहरात येत आहेत.
५. घनकचरा प्रकल्पातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे शहरातील २० हजारांहून अधिक नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त आहेत.
६. मोकाट कुत्र्यांपासून असो वा कचऱ्याचे ढीग असो अशा अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत.
७. गटारी, नाले पावसाळ्यात ओव्हरफ्लो होऊन नागरिकांच्या घरांपर्यंत पाणी शिरत असल्याने आरोग्याचा समस्या निर्माण होत आहेत.
सेनेच्या सत्तेचे सहा महिने पूर्ण
महापालिकेत सत्ता आल्यानंतर लागलीच कोणताही पक्ष तत्काळ बदल करूच शकत नाही. त्यासाठी प्रत्येक पक्षाला वेळ देणे गरजेचे असते. आता महापालिकेत सत्ता येऊन शिवसेनेला ६ महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. सहा महिन्यांचा कार्यकाळात मोठा निर्णय किंवा शहरासाठी कोणतेही मोठे काम सेनेला करता आलेले नाही. त्यात रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यात भाजपप्रमाणे सेनेचे दावेदेखील फोल ठरताना दिसून येत आहेत.
कोट...
भाजपच्या वेळेस ज्या प्रकारे आंदोलने करण्यात आली होती. त्याचप्रमाणे आंदोलने शिवसेनेच्या कार्यकाळातदेखील होतील. सेनेची सत्ता आल्यानंतर शहरातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी ६ महिन्यांचा वेळ सेनेला देण्यात आला होता. आता सहा महिने पूर्ण झाले आहेत. राज्यात जरी सेना महाविकास आघाडीत असली तरी जनतेच्या प्रश्नांबाबत कोणतीही हयगय सत्ताधाऱ्यांची केली जाणार नाही.
-अभिषेक पाटील, महानगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
शिवसेनेला सत्तेत आल्यानंतर शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ६ महिन्यांचा काळ दिला होता. आता तो पूर्ण झाला आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन, शहरातील नागरिकांच्या प्रश्नावर प्रशासनासह सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी पूर्ण तयारी आहे. जनतेचे प्रश्न सुटणे गरजेचे आहे.
-दीपक सूर्यवंशी, महानगराध्यक्ष, भाजप