थकबाकीमुळे गावातील पथदिवे बंद आहेत. आरओ प्रणालीचे शुद्ध पाणी हे दीड महिन्यापासून बंद आहे. सीसीटीव्ही कॅमेरे शो पीस बनले आहेत. अशा विविध समस्या निर्माण झालेल्या असताना गावातील सर्वपक्षीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना आज एकत्रित येऊन ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी वज्रमुठीची खरी गरज आहे. मात्र त्याबाबत शांतताच दिसत असल्याने गावकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आता पुढाकार कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकप्रतिनिधींनी वज्रमूठ बांधली नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे सर्वत्र खिल्ली उडत आहे.
जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून नशिराबादचा लौकिक आहे. येथील नगरपंचायतीची उद्घोषणा झाल्यामुळे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पुन:पुन्हा निवडणुकीचा खर्च नको यासाठी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून माघार घेण्यासाठी तब्बल ८२ पैकी ८१ जणांनी सामूहिक माघारीची वज्रमुठ बांधून राजकीय एकतेचे दर्शन घडविले होते. ग्रामविकासासाठी ही वज्रमूठ कायम असेल असा निर्धार त्यावेळी व्यक्त करण्यात आला होता. मात्र आज गावांमध्ये अनेक समस्या आ वासून उभ्या असतानाही कोणी दखल का घेत नाही, याची चर्चा आता गावात सुरू आहे. त्या निर्धाराचा सर्वांनाच विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.