स्टार - ९५८
सागर दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दहावीच्या निकालानंतर आता मुख्याध्यापकांसमोर नवीन पेच निर्माण झाला आहे. दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला देताना त्यावर शाळा सोडल्याची तारीख तसेच शेरा काय लिहायचा, असा प्रश्न निर्माण झाल्याने मुख्याध्यापकही संभ्रमात पडले आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाच्या सूचनांची प्रतीक्षा लागली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली; मात्र या परीक्षेचा नुकताच जाहीर झाला आहे. दरवर्षी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शाळांकडून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे दाखले तयार करण्याचे कामकाज सुरू होते; परंतु यंदा विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर तारीख व शेरा काय लिहायचा, असा प्रश्न मुख्याध्यापकांसमोर निर्माण झाला आहे. दुसरीकडे ३१ मे ही तारीख लिहिण्याचे कळविण्यात आले होते; मात्र व्हॉट्सअॅपवर आलेल्या एका पोस्टमध्ये १७ जुलै तारीख लिहावी, असे असल्यामुळे नेमकी कुठली तारीख दाखल्यावर लिहावी, हा संभ्रम मुख्याध्यापकांमध्ये निर्माण झाला आहे. याबाबत नाशिक शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्याशी लोकमतने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तो होऊ शकला नाही.
दाखले तयार करण्याचे कामकाज सुरू
शाळांमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे दाखले तयार करण्याचे कामकाज सुरू झालेले आहेत. मार्कशीट देताना दाखलासुद्धा शाळांना द्यावा लागणार आहे. यावर्षी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे शाळांवर दाखले तयार करण्याचे काम वाढले आहे. त्यामुळे दाखले तयार करण्यास सुरुवात करण्यासाठी शाळा सोडल्याची तारीख व शेरा याविषयी शिक्षण विभागाने लवकरात लवकर स्पष्ट सूचना कराव्यात, अशी मागणी मुख्याध्यापकांकडून होत आहे.
०००००००००००
दहावीतील एकूण विद्यार्थी - ५८,२७९
पास झालेले विद्यार्थी - ५८,२४९
जळगाव जिल्ह्याचा निकाल - ९९.९४
उत्तीर्ण मुले - ३३,४७८
उतीर्ण मुली - २४,७७१
०००००००००००
मुख्याध्यापक काय म्हणतात़़
दहावीचा निकाल लागला असून, दाखले देण्याचे काम आता सुरू होईल, त्याबाबत दाखल्यावर शाळा सोडल्याची तारीख काय लिहावी आणि शेरा काय लिहायचा, याबाबत अजूनही अनेक मुख्याध्यापकांच्या मनात संभ्रम आहे. हा संभ्रम लवकरात लवकर दूर करण्यात यावा.
- योगेश चौधरी, मुख्याध्यापक.
------
दाखले तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे; पण अजून दाखल्यावर तारीख लिहिलेली नाही. शिक्षण विभागाच्या सूचनांची प्रतीक्षा आहे. मार्कशीटसोबत दाखले वाटप केले जाणार आहेत.
- प्रतिभा सूर्यवंशी, मुख्याध्यापिका.
००००००००००००
पालक काय म्हणतात...
मुलीने सीईटीच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला आहे. तिचा स्पर्धा परीक्षांकडे फोकस असणार आहे. त्या अनुशंगाने अकरावीत विषयांची निवड करणार आहे.
- वैशाली ढेपे, पालक.
-------
संकेतस्थळ बंद असल्यामुळे अजून सीईटीचा अर्ज भरलेला नाही; मात्र मुलीच्या अभ्यासाला सुरुवात झाली आहे. तिला शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळत आहे.
- ज्ञानेश्वर पाटील, पालक.